मौलाना हुदाखान विरुद्ध एफ.आय.आर.
उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेवरुन ईडीची कारवाई
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटीश नागरिकत्व घेऊनही भारतातून वेतन मिळविणारा मौलाना शमसूल हुडा खान याच्या विरोधात प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरण सादर नोंद केले आहे. ही कारवाई उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेवरुन करण्यात आली आहे. मौलाना खान याची नियुक्ती 1984 मध्ये सहाय्यक शिक्षक पदावर उत्तर प्रदेशातील एका मदरशात करण्यात आली होती. त्याने 2013 मध्ये ब्रिटनचे नागरिकत्व मिळविले. तो ब्रिटनमध्ये स्थायीकही झाला. तथापि, त्याने 2013 ते 2017 या चार वर्षांच्या कालावधीत भारतातून वेतनही मिळविले, हे उघड होत आहे. याशिवाय त्याच्या विरोधात धर्मांध विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. सध्या तो ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे.
भारतात नोकरी करत असतानाही त्याने गेल्या 20 वर्षांपासून अनेक देशांचा प्रवास केला. अनेक देशांमधून त्याला मोठ्या प्रमाणात धन मिळाल्याचे उघड झाले आहे. त्याने विदेशांमधून बेकायदेशीररित्या अनेक कोटी रुपयांचा निधी मिळविला असून या निधीचा हिशेबही त्याने दिलेला नाही. त्याने या निधीचा अपहार केला असून त्यामुळे त्याच्या विरोधात मनी लाँडरिंग प्रकरण सादर करण्यात आले आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याला ब्रिटनमधून भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेक मदरशांना बेकायदा अर्थसाहाय्य
शमसूल खान याने भारतातील अनेक मदरशांना बेकायदा अर्थसाहाय्य केल्याची तक्रार सादर करण्यात आली आहे. धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली हे अर्थसाहाय्य देण्यात येत होते. खान हा मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगढचा आहे. त्याने अनेक बेकायदा बिगर सरकारी संस्था स्थापन केल्या असून त्यांच्या माध्यमातून बेकायदा आर्थिक व्यवहार चालविलेले आहेत. त्याने या संस्थांच्या माध्यमातून, तसेच स्वत:च्या व्यक्तिगत खात्यांमधून मदरशांना अर्थसाहाय्य केल्याचे उघड झाले आहे. त्याने उत्तर प्रदेशमध्ये दोन मदरसा स्थापन केल्या होत्या. तथापि, चार वर्षांपूर्वी त्यांची मान्यता काढून घेण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
ब्रिटनमधील धर्मांधांशी संबंध
खान याचे संबंध ब्रिटनमधील इस्लामी धर्मांध संघटनांशी आहेत. भारतात इस्लामी धर्मांधता वाढीला लावण्याची त्याची योजना आहे. भारतात विविध समाजांमध्ये फूट पाडण्याचे त्याचे प्रयत्न असून गेल्या काही वर्षांपासून त्याच्या हालचालींवर आणि आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ईडीकडून त्याच्या नेटवर्कची माहिती घेण्याचे काम होत असून लवकरच त्याला जेरबंद केले जाईल. त्यानंतर त्याच्यावर अभियोग चालविला जाईल, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
Comments are closed.