आम्ही हत्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही!

भारताने बांगलादेशला ठणकावले : हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल व्यक्त केली चिंता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू लोकांवर सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत भारताची भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांवरील सुरू असलेला द्वेष हा गंभीर चिंतेचा विषय आहे. बांगलादेशात अलिकडेच झालेल्या एका हिंदू तरुणाच्या हत्येचा भारत तीव्र निषेध करतो. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असे जयस्वाल यांनी म्हटले आहे. तसेच या घृणास्पद गुह्यातील आरोपींवर जलदगतीने कारवाई व्हायला हवी अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

बांगलादेशातील घटनांवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दिवसात वारंवार हिंदूविरोधी आवाज बुलंद होताना दिसत आहे. तसेच आता हत्यांसारख्या क्रूर घटनाही घडत असल्याने भारत गप्प राहू शकत नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. बांगलादेश सरकार अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करेल अशी अपेक्षा करतो. भारत बांगलादेशातील लोकांशी आपले संबंध मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्हाला बांगलादेशात शांतता आणि स्थिरता हवी आहे. आम्ही बांगलादेशात मुक्त, निष्पक्ष, समावेशक आणि सहभागी निवडणुकांसाठी सातत्याने पाठबळ दिले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.

बांगलादेशात, दीपू दास या हिंदूला ईशनिंदेच्या आरोपाखाली मारहाण करून ठार मारण्यात आले. त्याचे शरीर जाळण्यात आले. अंतरिम सरकारने दीपूच्या हत्येचा तीव्र निषेध करताना नवीन बांगलादेशात अशा हिंसाचाराला स्थान नसल्याचे म्हटले आहे. या घृणास्पद गुह्यात दोषी असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही हिंसाचार, धमकी, जाळपोळ आणि मालमत्तेचा नाश या सर्व कृत्यांचा तीव्र निषेध करतो, असे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने म्हटले आहे.

भारत-बांगलादेश संबंधांमध्ये बिघाड

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यापासून, बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांविरुद्धच्या असंख्य घटनांचा हिंदू लोकसंख्येवर परिणाम झाला आहे. ठराविक दिवसांनी हत्त्या किंवा हल्लासत्र सुरूच असल्याने हिंदू लोक भीतीच्या छायेखाली जगत आहे. बांगलादेशातील अशा घटनांचा जागतिक पातळीवरही निषेध होत असला तरी सदर प्रकार थांबताना दिसत नाहीत. हिंदूंवरील हल्ल्यांमुळे सध्या भारत आणि बांगलादेशमधील संबंधित चिघळताना दिसत आहेत.

Comments are closed.