क्रिकेटर वैभवसह 20 मुलांना बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण : पंतप्रधानांचीही उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वीर बाल दिनानिमित्त शुक्रवारी 20 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट आणि धाडसी कार्यासाठी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून या मुलांना निवडण्यात आले. 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे वीर बाल दिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात शुक्रवारी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या 20 मुलांपैकी दोघांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तामिळनाडूतील ब्योमा आणि बिहारमधील कमलेश कुमार यांच्या पालकांनी त्यांचे पुरस्कार स्वीकारले. कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान मोदींनीही विजेत्यांची भेट घेत त्यांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी मुलांना संबोधित करताना जनरेशन-झेड आणि जनरेशन अल्फा आपल्याला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जातील, असा आशावाद व्यक्त केला.
गुरु गोविंद सिंह यांच्या चार पुत्रांच्या हौतात्म्याच्या सन्मानार्थ वीर बाल दिवस साजरा केला जातो. गुरु गोविंद सिंह यांना त्यांच्या तीन पत्नींपासून अजित, जुझार, जोरावर आणि फतेह ही चार मुले होती. त्यांना ‘साहिबजादे’ असेही म्हणतात. 26 डिसेंबर 1705 रोजी मुघल सैन्याने चारही पुत्रांना ठार मारले. त्यांच्या हौतात्म्याचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 26 डिसेंबर 2022 रोजी वीर बाल दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्या दिवसानिमित्त विजेत्यांना बाल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पंतप्रधानांकडून तरुणांना संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमादरम्यान आज आपण आपल्या भारताचा अभिमान असलेल्या शूर साहिबजादांचे स्मरण करत असल्याचा उल्लेख केला. ‘साहिबजादे’ हे भारताच्या अदम्य धैर्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहेत. वय आणि रंगमंचाच्या सीमा तोडणारे ते शूर योद्धे होते. ते क्रूर मुघल साम्राज्याविरुद्ध खडकासारखे उभे राहिले. त्यांनी धार्मिक कट्टरता आणि दहशतवादाचे अस्तित्व हादरवून टाकले. त्यांच्याकडून तरुण पिढीला प्रेरणा मिळाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या चार वर्षांत वीर बाल दिनाच्या नवीन परंपरेने ‘साहिबजादें’ची प्रेरणा नवीन पिढीपर्यंत पोहोचवली आहे. वीर बाल दिनाने धाडसी आणि प्रतिभावान तरुणांच्या विकासासाठी एक व्यासपीठ देखील तयार केले आहे. दरवर्षी, विविध क्षेत्रात देशासाठी काहीतरी साध्य करणाऱ्या मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावेळी देखील देशाच्या विविध भागातील 20 मुलांना हे पुरस्कार देण्यात आले.
Comments are closed.