मुंबईत आढळली 1.68 लाख दुबार मतदार, मतदानासाठी 10 हजार 300 केंद्रे

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मुंबईत एकूण 10,300 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीत 10,111 मतदान केंद्रे होती. यंदा त्यात 189 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या अंतिम प्रभागनिहाय मतदार यादीप्रमाणे शहरात एकूण 10.34 लाख मतदार आहेत. हे मतदार 227 प्रभागांत विभागलेले आहेत.

मतदारांनी त्यांच्या प्रभागाच्या हद्दीतच मतदान करावे, यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 10,300 मतदान केंद्रांमुळे प्रत्येक केंद्रावर सुमारे 1,000 मतदार अपेक्षित आहेत. यापैकी सुमारे 700 मतदान केंद्रे निवासी संकुलांमध्ये उभारण्यात येणार आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “विधानसभा मतदारसंघ आणि प्रभाग सीमा एकसारख्या नाहीत. प्रभागांच्या सीमारेषा स्पष्ट असल्याने मतदारांनी आपल्या प्रभागातच मतदान करणे योग्य आहे.” तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्रात मोबाईल फोन आणण्यास बंदी असणार आहे.

दरम्यान, पालिकेने दुबार मतदार ओळखण्यासाठी घरोघरी जाऊन केलेली तपासणी पूर्ण केल्याचे कळते. एकूण 11.01 लाख नावे संशयित म्हणून तपासण्यात आली. त्यापैकी केवळ 15 टक्के म्हणजेच 1.68 लाख नावे खरी दुबार असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान 1.28 लाख मतदारांच्या घरी भेटी देण्यात आल्या. त्यापैकी 48,628 मतदारांनी परिशिष्ट-01 भरले, तर 78,105 मतदारांनी फॉर्म भरण्यास नकार दिला किंवा ते प्रत्यक्षात अस्तित्वात आढळले नाहीत.

मुंबईतील महापालिका निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर 29 डिसेंबर ते 5 जानेवारीदरम्यान निवडणूक कामकाजासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणात आचारसंहिता, मतदान प्रक्रिया, मतमोजणी, तसेच आणीबाणीच्या प्रसंगी करावयाची कारवाई या बाबींवर मार्गदर्शन देण्यात येईल. प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा बीएमसीने दिला आहे.

Comments are closed.