आयारामांना पायघड्या; सोलापुरात भाजपमध्ये धुसफुस, निष्ठावंतांना डावलल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करू: आमदारांची भूमिका

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रवेश झाले आहेत. निष्ठावंतांना डावलून आयारामांना पायघड्या घातल्या जात असल्याने भाजपमध्ये धुसफुस वाढली आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करू, असा इशाराच भाजपच्या आमदारांनी दिला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा ‘निष्ठावंत पॅटर्न’ सुरू झाला आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास ते कुठल्याही पक्षातून उभे राहू दे आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार अशी भूमिका आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे.

जागांच्या वाटाघाटी केवळ पालकमंत्री करतात

निवडणूक समितीत कोण कोण आहेत मला माहिती नाही. त्यामुळे जागांच्या वाटघाटी हे केवळ पालकमंत्री जयकुमार गोरे करत आहेत. कोणाशी चर्चा करायच्या हे माहिती नसल्याने मी कुठेही चर्चेला गेलो नसल्याचे मत विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक उमेदवारांच्या मुलाखती घेतात

पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्याची किती क्षमता आहे याबाबत मुलाखतीतून विचारणा होते. भाजपमध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही, असे सुभाष देशमुख म्हणाले.

Comments are closed.