बॉक्सिंग डे कसोटीत गोलंदाजांचे वर्चस्व; अॅशेसच्या 100 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच हा प्रसंग
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील या चौथ्या कसोटीत गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला. इंग्लंडच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 152 धावांत आटोपला.
यानंतर प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडलाही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी फारशी उसंत दिली नाही. मायकेल नेसर आणि स्कॉट बोलँड यांच्या अचूक व टोकदार गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव केवळ 110 धावांत कोसळला. त्यामुळे सामन्यातील चुरस कायम राहिली. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही आणि संपूर्ण संघ 132 धावांत बाद झाला. इंग्लंडसमोर विजयासाठी 175 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
हे लक्ष्य इंग्लंडने सहा विकेट्स गमावून गाठले आणि चार विकेट्सने सामना जिंकत मालिकेतील पहिला विजय नोंदवला. सलग तीन पराभवानंतर मिळालेल्या या विजयामुळे इंग्लंड संघाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी मालिकेत ऑस्ट्रेलिया अजूनही 3-1 अशी आघाडीवर आहे.
विशेष म्हणजे, गेल्या 100 वर्षांत अॅशेस मालिकेतील कसोटी सामना केवळ दोन दिवसांत संपण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याच मालिकेतील पहिला सामना पर्थ येथेही दोन दिवसांत संपला होता. त्या सामन्यात गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले होते आणि ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर विजय मिळवला होता. पर्थ कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 172 धावा केल्या होत्या, त्याला उत्तर म्हणून ऑस्ट्रेलियाने 132 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंड 164 धावांत बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी ट्रॅव्हिस हेडच्या स्फोटक शतक आणि मार्नस लाबुशेनच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज गाठले होते.
या दोन सामन्यांपूर्वी, अॅशेस मालिकेतील शेवटचा दोन दिवसांत संपलेला कसोटी सामना 1921 साली नॉटिंगहॅम येथे झाला होता. अॅशेसच्या दीर्घ इतिहासात आतापर्यंत एकूण सात वेळा कसोटी सामने दोन दिवसांत संपले आहेत. 1888 मध्ये लॉर्ड्स, द ओव्हल आणि मँचेस्टर येथे हे घडले होते. त्यानंतर 1890 मध्ये पुन्हा द ओव्हलवर सामना दोन दिवसांत संपला. 1921 मध्ये नॉटिंगहॅम, तर आता 2025 मध्ये पर्थ आणि मेलबर्न येथे ही दुर्मिळ घटना पाहायला मिळाली आहे.
Comments are closed.