आईच्या नावाने वृक्ष लावणारेच महाराष्ट्रात जंगलं नष्ट करत आहेत, तपोवनावरून आदित्य ठाकरे यांचा भाजपवर घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलकांनाची भेट घेतली. आंदोलकांशी संवाद साधत पर्यावरणविषयक मुद्द्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले की,“गेल्या दहा वर्षांत 12 लाख हिंदुस्थानी देश सोडून गेले आहेत. काहीजण मुलांच्या भविष्यासाठी जातात; परंतु हे सगळे प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? नाही. आपले पंतप्रधान जगभर जातात आणि ‘एक पेड माँ के नाम’ अशी घोषणा देतात; पण त्यांचाच पक्ष महाराष्ट्रात जंगलं नष्ट करत आहे.”
ते पुढे म्हणाले, “तपोवन, मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, पुण्यातील वेताळ टेकडी, नागपूरमधील अजनी वन या सगळ्यांचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. चंद्रपूरमध्ये फ्लाय ॲशचे डंपिंग पूर्णपणे अवैज्ञानिक पद्धतीने होत होते. मी मंत्री असताना एका महिन्यात जवळपास 70 टक्के जागा स्वच्छ केली होती; पण बेकायदेशीर सरकार आल्यापासून पुन्हा फ्लाय ॲश डंपिंग सुरू झाले.”
प्रदूषणाच्या धोक्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “दिल्लीसह अनेक शहरांत हवा गुणवत्तेचे निर्देशांक अत्यंत धोकादायक पातळीवर आहेत. अरावली कापायची, वेस्टर्न घाट कापायचे, सर्वत्र मायनिंग करायचं, झाडं तोडायची. मग उरणार काय? वाळवंट झाल्यानंतर आपण इथे वाळवंटात राहणार का? पैसे खाणारे परदेशी निघून जातील; भोगायला आपणच राहू.”
कुंभमेळ्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, “कुंभमेळ्याला कोणी विरोध केला नाही. साधू-महंत जिथे वनात तपश्चर्या करता येते अशा ठिकाणी येतात. पंचवटी आणि तपोवन ही प्रभू श्रीरामांची भूमी आहे. हे सगळं तोडून आपण कुठचा धर्म वाचवणार आहोत?”
धर्म आणि पर्यावरण यांचा संबंध सांगताना ते म्हणाले, “आपला धर्म वैदिक धर्म आहे. मूर्तींपूर्वी आपण पंचमहाभूतांची पूजा केली. आज नद्या, समुद्र, जंगलंसर्वत्र प्रदूषण वाढले आहे. पंचमहाभूतांना आपणच प्रदूषित करत असू तर धर्म टिकणार कसा? हिंदुत्व आणि वैदिक धर्म टिकवायचा असेल तर पंचमहाभूतांची खरी पूजा म्हणजे त्यांचे संरक्षण करणे, त्यांना प्रदूषणापासून वाचवणे हीच खरी आस्था आहे.”
पुण्यातील नदीप्रदूषणाचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “जगभर नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले जाते; पण येथे उलटच चालते. नदी अरुंद केली जाते. हे पर्यावरणविरोधी आहे.” आंदोलकांना पूर्ण पाठिंबा व्यक्त करत ते म्हणाले, “उद्धव साहेबांनी मला खास यासाठी पाठवलं आहे. पक्ष म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला हवं ते लिहून देऊ. पण एक ठरवा या वनाला कोणी हात लावू द्यायचा नाही. बाहेरचे कंत्राटदार कोण आहेत, हे नंतर पाहू; पण श्वासच घेता आला नाही तर आपले-परके असं काहीच उरणार नाही.”
शेवटी सर्व राजकीय पक्षांना इशारा देताना त्यांनी म्हटले, “नाशिकने अरावलीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलं पाहिजे. जर वन वाचवण्याची ताकद आणि वचन दिलं नाही, तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.”
Comments are closed.