भाजपने स्वबळावर लढावे ही नवी मुंबईकरांची इच्छा; संजीव नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचले

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ही भाजपने स्वबळावर लढवावी अशी फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच नाही तर सर्वसामान्य जनतेचीही इच्छा आहे. शिंदे गटाबरोबर युती नको, असा आग्रह सर्वच स्तरातून होत असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे नवी मुंबई महापालि का निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईक यांनी केला आहे.
पालिका निवडणूक महायुतीत लढवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या दोन बैठका झाल्या असतानाच संजीव नाईक यांनी अप्रत्यक्ष स्वबळाचा नारा देत एकनाथ शिंदे यांना डिवचल्यामुळे दोन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक महायुतीत लढवण्यासाठी बैठकांच्या फेरी सुरू आहेत. युतीमध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय नको, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.
यापूर्वीची निवडणूक २०१५ साली झाली होती. त्यामुळे समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपने स्वबळावर लढवावी अशी इच्छा शहरातील जनतेने व्यक्त केली आहे. तोच आग्रह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचाही आहे. स्वबळावर निवडणूक झाल्यानंतर ५६ पेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे असणार आहेत, असा दावा संजीव नाईक यांनी करून अप्रत्यक्ष युती नको या भाजप कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
भाजपचा शिंदे गटाला ‘दम मारो दम’, ठाण्यात सोबत येता की जाता? केळकर यांचा सूचक इशारा
भाजपचे कार्यकर्ते आणि इच्छुकांनी युती नको असा आग्रह धरल्यामुळे शिंदे गटाच्या इच्छुकांची अस्वस्था वाढली आहे. युतीवर लक्ष ठेवून अनेकांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाबरोबर घरोबा केला आहे. मात्र आता जागा वाटपाबाबत कोणताही तोडगा निघत नसल्याने या इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे.

Comments are closed.