बॉक्सिंग डे कसोटीचा दुसऱ्याच दिवशी निकाल, इंग्लंडचा 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात दणदणीत विजय
मेलबर्न: ॲशेस 2025-26 मध्ये इंग्लंडला पहिला विजय मिळाला आहे. इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला बॉक्सिंग डे कसोटीत दुसऱ्याच दिवशी 4 विकेटनं पराभूत केलं. इंग्लंडला ऑस्ट्रेलियात तब्बल 14 वर्षानंतर विजय मिळाला आहे. विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यानंतर बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर गेल्या 15 वर्षात विजय मिळवणारा बेन स्टोक्स तिसरा कॅप्टन ठरला आहे.
ENG vs AUS : इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनं विजय
ॲशेस 2025-26 मधील ही दुसरी कसोटी आहे जी 2 दिवसात संपली आहे. तर,आतापर्यंतचे चार सामने 12 दिवसात संपले आहेत. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 152 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ 110 धावा करु शकल्यानं ऑस्ट्रेलियाला 42 धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 132 धावांवर बाद झाला. यामुळं इंग्लंडला विजयासाठी 175 धावांचं आव्हान मिळालं होतं.
मेलबर्नची खेळपट्टी गोलंदाजांना फायदेशीर असली तरी इंग्लंडच्या फलंदाजांनी संयमी खेळी करत विजय मिळवला. जॅक क्रॉलीनं 37, बेन डकेट यानं 34 धावा, जॅकब बेथेल यानं 40 धावा केल्या. इंग्लंडनं 6 विकेट गमावून ही कसोटी जिंकली. इंग्लंडच्या जोश टंग याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. जोश टंग यांन पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात 2 विकेट घेतल्या.
5468 दिवसानंतर विजय
ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडनं 5468 दिवसानंतर म्हणजेच 14 वर्षानंतर पहिला विजय मिळवला आहे. इंग्लंडनं ऑस्ट्रेलियात 7 जानेवारी 2011 रोजी सिडनी कसोटीत विजय मिळवला होता. इंग्लंडनं दुसऱ्या डावात बेजबॉल अंदाजात फलंदाजी केली. इंग्लंडनं दुसऱ्या डावात 32.2 ओव्हरमध्ये 6 बाद 178 धावा करत विजय मिळवला. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याला ऑस्ट्रेलियात 13 कसोटीनंतर पहिला विजय मिळाला आहे.
मेलबर्नमधील चौथ्या कसोटीत दोन्ही संघातील एका फलंदाजाला दोन्ही डावात अर्धशतक करता आलेलं नाही. यामॅचमध्ये 572 धावा झाल्या मात्र, एकाही फलंदाजानं अर्धशतक करता आलं नाही.
बेन स्टोक्स विजयानंतर काय म्हणाला?
इंग्लंडला ऑस्ट्रेलियात 14 वर्षानंतर विजय मिळवून देणारा बेन स्टोक्स म्हणाला विजयामुळं खरंच खूप चांगलं वाटतंय, सर्वांनी यासाठी खूप मेहनत घेतली. हा विजय खूप विशेष आहे, आम्ही फक्त आमच्यासाठी नाही, खूप लोकांसाठी खेळतो. जगात आम्ही कुठंही गेलो तरी आम्हाला जबरदस्त पाठिंबा मिळतो. घोषणा दिल्य जातात,जयघोष केला जातो, आम्ही हे ऐकत असतो आणि ते अनुभवतो, मला माहिती आहे, आमचे बहुतांश चाहते उत्साहित असतील, असं बेन स्टोक्स म्हणाला.
या मॅचपूर्वी खूप काही घडलं होतं, मात्र, सहकाऱ्यांनी मैदानावर उतरणं, केंद्रीत राहणं आणि ज्या प्रकारे त्यांनी कामगिरी केली ते टीम बद्दल खूप काही सांगून जातं. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि व्यवस्थापनला या यशाचं श्रेय जातं. धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं नव्हतं, खेळपट्टीत खूप काही होतं, गोलंदाजांचं या मॅचवर वर्चस्व होतं. आमचा मेसेज स्पष्ट होता, सकारात्मक राहा, गोलंदाजांना सेटल होऊ देऊ नका, त्यांच्यावर प्रहार करत राहू, असं ठरलं होतं. मला वाटतं आम्ही ज्या प्रकारे इच्छाशक्ती आणि शिस्त दाखवली ते शानदार होतं, असं बेन स्टोक्स म्हणाला.
आणखी वाचा
Comments are closed.