WTC 2025-27: गुणतालिकेत उलथापालथ; इंग्लंडचा फायदा, ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव
इंग्लंड क्रिकेट संघाने अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला चार गडी राखून पराभूत करत मोठा पराक्रम केला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडने कोणताही मोठा अडथळा न येऊ देता हे लक्ष्य सहज पार केले. विशेष म्हणजे, ही इंग्लंडची 2011 नंतर ऑस्ट्रेलियातील पहिली कसोटी विजय ठरली असून कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली संघाला हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला.
या विजयामुळे इंग्लंडला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या गुणतालिकेत फायदा झाला आहे. इंग्लंडचा ‘पर्सेंटेज ऑफ पॉइंट्स’ (PCT) वाढून आता 35.19 झाला आहे. सामन्यापूर्वी हा आकडा 27.08 इतका होता. मात्र, PCT वाढूनही इंग्लंडचे स्थान बदललेले नाही आणि संघ अद्याप सातव्या क्रमांकावरच आहे. सध्याच्या चक्रात इंग्लंडने एकूण 9 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामने जिंकले, 5 सामने गमावले आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला WTC 2025-27 मधील पहिला पराभव स्वीकारावा लागला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने या चक्रात खेळलेले सहाही सामने जिंकले होते. या पराभवाचा त्यांना गुणतालिकेत फारसा फटका बसलेला नाही आणि ऑस्ट्रेलिया अद्याप पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र, त्यांचा PCT 100 टक्क्यांवरून घसरत 85.71 झाला आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ सध्या WTC गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 9 सामने खेळले असून 4 विजय, 4 पराभव आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे. भारताचा सध्याचा PCT 48.15 आहे. विशेष म्हणजे, भारताला नुकतीच घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका 0-2 अशी गमवावी लागली होती.
Comments are closed.