VIDEO: 15 वर्षांचा दुष्काळ संपला! ऑस्ट्रेलियात इंग्लंडची ऐतिहासिक कसोटी विजयगाथा; स्टुअर्ट ब्रॉड भावुक

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर तब्बल 5468 दिवसांचा दुष्काळ संपवत इंग्लंडने अखेर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. ॲशेस 2025-26 मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने मात करत जवळपास 15 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी विजय मिळवला. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी सामना निकालात निघाला आणि क्रिकेटप्रेमींसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.

175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ केला. काही विकेट्स पडल्या असल्या तरी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली संघाने लक्ष्य 6 विकेट्स गमावून पूर्ण केले आणि ऐतिहासिक विजय साजरा केला. हा विजय केवळ सामन्यापुरता मर्यादित नव्हता, तर इंग्लंड क्रिकेटसाठी भावनिक ठरला.

या विजयाने इंग्लंडचा माजी दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड भावुक झाला. कमेंट्री बॉक्समध्ये असताना त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू स्पष्ट दिसत होते. सहकारी समालोचकांनी त्याच्या पाठीवर थाप देत अभिनंदन केले. इंग्लंडच्या विजयावर प्रतिक्रिया देताना ब्रॉडने बेन स्टोक्स आणि जो रूट यांचे खास आभार मानले.

स्टुअर्ट ब्रॉड भावनिक स्वरात म्हणाले, “16 वेदनादायक पराभव, 2 ड्रॉ आणि त्यानंतर ही विजयगाथा. या कसोटी विजयाचा अर्थ काय आहे, ते फॅन्सच्या चेहऱ्यावरच्या आनंदातून स्पष्ट दिसते. इंग्लंडने एमसीजीवर कसोटी जिंकली आहे आणि संपूर्ण जग हे पाहत आहे. थँक यू बेन स्टोक्स, थँक यू जो रूट. ते ही विजय पूर्णपणे डिजर्व करतात. बेन स्टोक्स या मालिकेतील खरा वॉरियर ठरला आहे.”

ब्रॉडचा हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत.

Comments are closed.