दिग्विजय सिंह यांनी आरएसएसचे कौतुक केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रही केले प्रसिद्ध

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्वपरिचित टीकाकार दिग्विजयसिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केली आहे. संघाच्या संघटनाशक्तीचे त्यांनी कौतुक केले असून एक सर्वसामान्य कार्यकर्ताही संघामुळे देशाचा सर्वोच्च नेता होऊ शकतो, अशी टिप्पणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसवमेतचे जुने छायाचित्रही प्रसिद्ध केले. या कृतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

सिंग यांनी केलेल्या संघाच्या प्रशंसेसह त्यांनी प्रसिद्ध केलेल्या या छायाचित्राचीही आता चर्चा होत आहे. हे छायाचित्र 1990 मधील असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे साधे कार्यकर्ते होते. ते खाली जमीनीवर बसलेले असून त्यावेळचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी खुर्चीवर बसलेले या छायाचित्रात आढळून येते. गुजरातमधील एका कार्यक्रम प्रसंगाचे हे छायाचित्र आहे.

राजकारणातील आश्चर्य

दिग्विजयसिंग यांच्यासारख्या संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कट्टर टीकाकाराने संघाची अशी प्रंशसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रही प्रसिद्ध करावे, हे राजकारणातील एक आश्चर्य मानले जात आहे. हा त्यांनी काँग्रेसच्या आजच्या नेतृत्वाला दिलेला अप्रत्यक्ष संदेश आहे, असाही याचा अर्थ लावला जात आहे. या छायाचित्राचे वर्णन सिंग यांनी ‘प्रभावशाली’ अशा शब्दात केले आहे. या छायाचित्रातून काँग्रेस नेत्यांनी बोध घ्यावा, असेही त्यांना सुचवायचे असावे, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. काँग्रेसमध्येही चर्चा होत आहे.

छायाचित्र कोठे मिळाले…

हे छायाचित्र आपल्याला ‘क्वोरा’ या वेबसाईटवर मिळाले. 35 वर्षांपूर्वी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत खाली जमीनीवर बसलेला एक अपरिचित आणि सर्वसामान्य कार्यकर्ता प्रथम गुजरातचा मुख्यमंत्री बनला. आज तो देशाच्या सर्वोच्च नेतेपदी आहे. हे भारतीय जनता पक्षात घडू शकते. याचे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटनाशक्ती हे आहे. काँग्रेससाठी हे छायाचित्र मार्गदर्शक ठरु शकेल, अशा अर्थाची टिप्पणी त्यांनी सोशल मिडियावर केल्याने गदारोळ उठला आहे.

काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर…

सध्या काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत खदखद होत असल्याचे दिसते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दिग्विजयसिंग यांच्या या कृतीतून या अस्वस्थतेचा प्रत्यय येत आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सध्या दिल्लीत होत आहे. अशा प्रसंगी दिग्विजयसिंग यांच्यासारख्या नेत्याने असा संदेश प्रसारित करावा, हे काँग्रेसच्या सद्य:स्थितीचे द्योतक आहे, अशी टिप्पणी अनेकांकडून करण्यात आली आहे.

सिंग यांचा हा ‘ट्रूथ बाँब’

दिग्विजयसिंग यांच्या या संदेशावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी भारतीय जनता पक्षानेही साधली असून हा दिग्विजयसिंग यांनी काँग्रेसवर टाकलेला ‘ट्रूथ बाँब‘ असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सी. आर. केशवन यांनी केले आहे. राहुल गांधी सिंग यांच्या या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे धाडस दाखवितील काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सिंग यांनी काँग्रेसला अक्षरश: उघडे केले आहे. काँग्रेसचे नेतृत्व करणारे नेहरु-गांधी कुटुंब कशा प्रकारे पक्ष चालवते, याची प्रचीती सिंग यांच्या या संदेशातून येते. काँग्रेसचे हे ‘प्रथम कुटुंब’ पक्षांतर्गत लोकशाहीपासून किती दूर आहे आणि काँग्रेसवर या कुटुंबाचे किती टोकाचे नियंत्रण आहे, याचा धडा या संदेशातून सिंग यांनी दिला असून काँग्रेसने तो लक्षात घ्यावा, असेही आवाहन केशवन यांनी केलेले आहे.

 

Comments are closed.