साहित्य-सोहळा – लोकजागराचा वसा
>>दर पंजाब राव मोरे, [email protected]
27 ते 28 डिसेंबर या कालावधीत बुलढाण्यात ‘लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन’ पार पडत आहे. त्यानिमित्त…
प्रत्येक माणसाची आयुष्यात काही ध्येये असतात. कुणी स्वार्थ कवटाळत बसतो, तर कुणी नि:संग होऊन समाजसेवेचे व्रत अंगीकारतो. कफल्लक राहूनही समाजात नवनव्या विचारांची पेरणी करून समाजाला प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करतो. असाच एक अत्यंत निष्ठेने आंबेडकरी चळवळ वाडय़ा-वस्त्यांमध्ये पोहोचविण्यासाठी झपाटलेला महाकवी म्हणजे वामन तबाजी कर्डक अर्थात आपल्या सर्वांचं लाडकं नाव ‘वामनदादा कर्डक’.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारे बुलढाणा येथील लोककवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठान आदर्शाचा वारसा वृद्धिंगत करण्याचे महान कार्य करत आहे. प्रतिष्ठान ही केवळ एक संस्था नसून ती सामाजिक बांधीलकी जपणाऱया कार्यकर्त्यांची ऊर्जाभूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित असलेल्या या संस्थेची धुरा वाहणाऱयांपैकी तीन कार्यकर्त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे 27 आणि 28 डिसेंबर रोजी होणारे लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन हे लोकजागराचा वारसा जपणारे समाजभूषणांचे साहित्य संमेलन ठरणार आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर डी. आर. इंगळे हे आंबेडकरी जलसा परंपरेतील महाराष्ट्रातील एक दिग्गज नाव आहे. अनेक दशकांपासून त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने आणि समर्थ लेखणीने आंबेडकरी चळवळीचा विचार जनमानसात भक्कमपणे रुजवला आहे. वयाच्या 78व्या वर्षीही त्यांच्यातील ऊर्जा आणि धडाडी तरुणांनाही लाजवणारी आहे. आंबेडकरी जलशाला एक वैभवशाली परंपरा आणि जाज्वल्य इतिहास आहे. प्रतिष्ठानचे सचिव ‘समाजभूषण’ सुरेश साबळे हे एक सिद्धहस्त साहित्यिक आहेत. अत्यंत क्लिष्ट विषयांवरील त्यांचे मर्मबंधी विवेचन आणि लेखन समर्थ वैचारिक पेरणी करणारे आहे.
या दोन विभूतींच्या मार्गदर्शनात शालेय जीवनापासून आजवर माझे मार्पामण सुरू आहे. बुलढाणा जिह्यातील चौथा येथील भजनी मंडळात वडील वामनदादांची ‘नव हे नव्हाळीचं’, ‘हिंदू धर्माची द्या फेकुनी कांबळी’, ‘चल गं हरणे तुरुतुरु’, ‘केस माझे हे जेव्हा गळू लागले’ आदी गाणी दररोज कानावर पडत असत. त्यातून दादांच्या शैलीतील गाणी लिहिण्याचा प्रयत्न करू लागलो. दरम्यान, एकदा बुलढाण्याच्या टिळक मैदानावरील कलावंतांच्या मेळाव्यात पहिल्यांदा वामनदादांना पाहिले. त्यानंतर शासकीय वसतिगृहात असताना शाहीर डी. आर. इंगळे यांच्या घरी त्यांच्या मुलांसोबत खेळणारे वामनदादा अनेकदा पाहिले. वामनदादा आणि प्रतापसिंग बोदडे यांच्यासोबत कार्पामाला जाण्याची अनेकदा संधी मिळाली. या गुरु-शिष्याची मनाला भिडणारी गायकी भरभरून ऐकण्याचे भाग्य मिळाले. त्यातून दादांची चांगलीच ओळख झाली. दादांनी दिलेली ‘मास्तर’ ही पदवी आजही हिऱयामोत्यांपेक्षा मौल्यवान वाटते.
या वर्षी प्रतिष्ठानने ‘लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. वामनदादांची गाणी म्हणजे केवळ शब्द नसून ते परिवर्तनाचे मंत्र आहेत. “सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठाय हो? सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?” असा रोखठोक सवाल करणाऱया कवीच्या नावाने होणारे हे संमेलन साहित्यातील उपेक्षितांना हक्काचे विचारपीठ मिळवून देणारे ठरेल यात शंका नाही.
हे साहित्य संमेलन केवळ कवी संमेलन किंवा परिसंवादापुरते मर्यादित नसून ते समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे महाअधिवेशन ठरणार आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा धागा जोडणारे हे संमेलन सांस्कृतिक चळवळीत मोलाची भर घालेल.
2003 मध्ये स्थापन झाल्यापासून या प्रतिष्ठानने मागे वळून पाहिले नाही. संस्थेत काम करणाऱया प्रत्येक तळमळ असलेल्या माणसांमुळेच कला, साहित्य आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांचा संगम या संस्थेत सदासर्वकाळ बघायला मिळतो. जेव्हा एखादी संस्था ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ पुरस्काराने गौरवली जाते तेव्हा तिची जबाबदारी अधिक वाढते. लोककवींच्या विचारांचा वारसा जपतानाच नवनवीन पिढीला साहित्याशी जोडणे आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे हे या प्रतिष्ठानचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. सांस्कृतिक प्रबोधनासाठी जलसा आणि पथनाटय़ांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्त्राr शिक्षणाचा प्रसार, साहित्यिक योगदानातून आंबेडकरी साहित्यावर चर्चासत्रे आणि ग्रंथ प्रकाशन तसेच समाजासाठी झटणाऱया कार्यकर्त्यांचा यथोचित गौरव ही या प्रतिष्ठानची उद्दिष्टे आहेत.
‘वामनदादांच्या लोकजागराचा वसा’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून अध्यक्ष शाहीर डी. आर. इंगळे, सचिव साहित्यिक सुरेश साबळे आणि मी आजही त्याच उत्साहाने काम करत आहोत. प्रतिष्ठानने आयोजित केलेले आगामी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांत कोरले जाईल यात शंका नाही. प्रतिष्ठानचा हा प्रवास येणाऱया अनेक पिढय़ांसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरो!
Comments are closed.