तपोवनातील झाडे तोडून सरकार कुठला धर्म वाचवणार!आदित्य ठाकरे यांचा थेट सवाल

आपला वैदिक धर्म पंचमहाभूतांची पूजा करणारा आहे. प्रभू श्रीरामांचे नाशिकच्या तपोवनात वास्तव्य होते, असे वन नष्ट करून सरकार कुठला धर्म वाचवणार आहे, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. आचारसंहिता संपताच तपोवनाला रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा द्या, तो मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. अरवलीसाठी लढणाऱ्या जनतेसारखी चळवळ उभी करू, विकासाच्या नावाखाली हरित क्षेत्र नष्ट करून बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव उधळून लावू, असा इशारा दिला. कुंभमेळय़ाला आमचा विरोध नाही, तो झालाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे तपोवनाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

सर्व जमीन बिल्डरच्या मालकीची आहे

या सरकारचा धर्म बिल्डर धर्म आहे, सब भूमी बिल्डर की, असंच त्यांना वाटतंय, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. माईस हब कुठेही होईल, तरी ठक्कर म्हणून कुणी बिल्डर आहे, त्याने मुख्यमंत्र्यांसोबतचा व्हिडीओ व्हायरल केला होता, तो मुख्यमंत्र्यांना सुचवतो. तपोवनला यलो झोन करून बिल्डरांना तुम्ही सगळं देणार असाल तर नाशिककरांच्या हाती काय उरणार, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. झाडांवर कुऱ्हाड चालवू पाहणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना मतदान होऊच नये. कारण, ते आता थातूरमातूर सांगतील, नंतर बुलडोझर घेऊन येतील, अशा शब्दांत नाशिककरांना जागरूक केले.

…तर हनुमानाची ताकद दाखवून देऊ

त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी ते ब्रह्मगिरी पर्वतापर्यंतच्या रोप वेसाठी सरकारने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, याआधी आम्ही तेथील पर्यावरण रक्षणासाठी आवाज उठवला होता. आता जर कुणी अंजनेरी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना आम्ही श्री हनुमानाची ताकद दाखवून देऊ, असा इशारा दिला.

नाशिकमध्ये श्रीरामराज्य आणण्यासाठी भाजपाला पराभूत करा

भाजपाची महाराष्ट्र गिळण्याची, शहरं संपवण्याची भूक भयानक आहे, रावणराज्य आणू पाहणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना पळवून लावून नाशिकमध्ये आपल्याला पुन्हा श्रीरामराज्य आणायचे आहे, परिवर्तन घडवायचे आहे, चांगले शिक्षण, आरोग्यसेवा देण्याचा आपला निर्धार आहे, त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ आदित्य ठाकरे यांनी शनिवारी देवळालीतील साई ग्रॅण्ड लॉन्स येथील शहर पदाधिकारी मेळाव्यातून केला.

Comments are closed.