रोखठोक – मावळत्या वर्षातील वावटळ सरताना…

2025 हे तुफान घटनांनी भरलेले वर्ष सरत आहे. पंतप्रधान मोदी यांना 75 वर्षे झाली तेव्हा ते निवृत्ती पत्करतील असे अनेकांना वाटले. मोदी तेथेच आहेत. देशाचे भवितव्य चार लोकांच्या हाती आहे ही भारतीय समाजजीवनाची शोकांतिका आहे. ती शोकांतिका नव्या वर्षात तुफानासारखी प्रवेश करत असेल तर नवे काय घडेल?
2025 हे तुफान घटनांनी भरलेले वर्ष येत्या बुधवारी सरत आहे. एक वर्षाचे पान पुन्हा उलटले. नवीन वर्षाचा अर्थ कॅलेंडर बदलण्याइतका सोपा नाही. आपण सगळेच वर्षाच्या अंतिम महिन्यात आहोत. या वर्षात सबंध जगातच अनेक स्थित्यंतरे घडली. नवीन वर्षात आपले पंतप्रधान भारतात आहेत काय, असा प्रश्न जनतेला पडला असेल. पंतप्रधान मोदी हे भारतातच असतील तर त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊच. वर्ष मावळताना पंतप्रधान मोदी हे इथिओपिया नावाच्या देशात होते. अशा प्रकारच्या अनेक देशांत मोदी यांचा वावर वाढला आहे. ज्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे त्या भारत देशात त्यांचा पाय टिकत नाही आणि ज्या देशाची लोकसंख्या साधारण लाखभर आहे, तेथे जाऊन त्या देशाचा सर्वोच्च ‘अवॉर्ड’ म्हणजे नागरी पुरस्कार घेऊन पंतप्रधान मोदी येतात याचे मोदींच्या अंधभक्तांना भलतेच कौतुक दिसते. अंधभक्तांनी हा देश अंधकारात ढकलला. तोच अंधकार नवीन वर्षात नेऊन कोणी दिवे पेटवण्याचा प्रयत्न केला तरी देशात प्रकाश पडणार नाही. अशा अंधाराचे साम्राज्य आज सर्वत्र दिसत आहे.
26 पर्यटकांचे बळी
मावळत्या वर्षात जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 पर्यटकांचे बळी घेतले. या हल्ल्याचे धार्मिक राजकारण भाजपने केले व हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाने सैनिकी कारवाई केली. त्या कारवाईचा अंत नक्की काय झाला हे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील सांगू शकत नाहीत. “पाकिस्तानला जन्माचा धडा शिकवू व आता पाकच्या ताब्यातील कश्मीरचा तुकडा घेऊनच युद्ध संपवू,” असे गरजणारी तोंडे नंतर अचानक बंद झाली. भारतीय सैन्य पराक्रम गाजवत असताना पंतप्रधान मोदी यांनी युद्धबंदी जाहीर केली व त्यामागे अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांची धमकी होती. “व्यापार बंद करू” असा दम भरल्यावर भारताने युद्ध थांबवले, असे प्रे. ट्रम्प यांनी आतापर्यंत शंभर वेळा सांगितले व भारतातर्फे प्रे. ट्रम्प यांचा प्रतिवाद केला गेला नाही. पाकिस्तानशी लढण्यासाठी 56 इंचाची छाती हवी असे सांगणारे मोदी प्रे. ट्रम्प यांच्यापुढे झुकले हे चित्र जगाने पाहिले. युद्ध म्हणजे काय याचा अनुभव सध्याच्या भारतीय पिढीला नाही. पराक्रमाला पर्याय नसतो आणि भित्रे व पळपुटे देशाला कधीच वाचवू शकत नाहीत याचा इतिहास घडविणाऱ्या चर्चिलचा आदर्श ठेवून मोदी सरकारला वागावयास लावणे आज गरजेचे आहे. नुसत्या अंधभक्तांच्या फौजा पोसून काय उपयोग? सैन्याचे अधिकारीही अंधभक्तांप्रमाणे बोलू लागले आहेत. सिंधमध्ये आणि बलुचिस्तानात ‘ऑपरेशन सिंदूर’प्रमाणे आपले लोक शिरायला हवे होते, पण ”आम्ही पाकिस्तानात घुसून मारू” या फक्त वल्गनाच ठरल्या.
मावळत्या वर्षातले धक्के
हिंदू आणि हिंदू राष्ट्राच्या नावावर निवडून आलेले मोदींचे सरकार सध्या आहे व जोपर्यंत मतदारांच्या डोक्यात धर्मांधतेचे खूळ आहे तोपर्यंत ‘मोदी’ पॅटर्नचे राजकारण अजेय राहील असे चित्र आज आहे. पंतप्रधान मोदी यांच्या काळात अयोध्येत राममंदिर उभे राहिले व मावळत्या वर्षात मंदिरावर धर्मध्वजा फडकवून जगातील हिंदूंना संदेश दिला. तरीही मोदी व त्यांचे लोक आज सांगतात की, “हिंदू खतरे में है.” देशात हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदू खतऱ्यात कसा याचे उत्तर मोदी व त्यांच्या अंधभक्तांकडे नाही.
मावळत्या वर्षाने काय दिले आणि काय पेरले हे पाहिले तर देश कोणत्या दिशेने चालला आहे हे समजेल.
लडाखमधील लोकनायक सोनम वांगचूक यांनी विकासाच्या मुद्द्यावर एक आंदोलन उभे केले तेव्हा मोदी व शहा यांनी वांगचूक यांना सरळ देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. भाजपने लडाखवासीयांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत एवढीच वांगचूक यांची मागणी होती. वांगचूक आता राजस्थानातील तुरुंगात आहेत.
चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश करून जमिनीवर ताबा घेतला व भारताने साधा प्रतिकारही केला नाही.
इराण-इस्रायल युद्धात इराणने इस्रायलला शरण आणले. अमेरिकेच्या सैन्यस्थळावर इराणने बॉम्ब टाकले. इराणने कोणत्याही महासत्तेपुढे झुकण्यास नकार दिला व शौर्य, स्वाभिमानाचे दर्शन घडवले. भारताने या विषयावर कुंपणावर राहणेच पसंत केले.
भाजप सरकारने रोजगाराची हमी देणाऱया ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजने’तून महात्मा गांधींचे नाव सरळ हटवले. ‘जी रामजी’ या प्रचारकी नावाने योजना सुरू केली.
बिहारची विधानसभा भाजप व नितीश कुमारांनी एकतर्फी जिंकली. तेजस्वी यादव यांना पन्नास जागांचा टप्पा पार करता आला नाही. भाजपच्या विजयात निवडणूक आयोगाचा वाटा मोठा होता.
एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे जाण्यास उडाले ते पुढच्या दोन मिनिटांत कोसळले. 12 जून 2025 रोजी ही भीषण दुर्घटना घडली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानींसह 230 प्रवाशांचा त्यात मृत्यू झाला. हा विमान अपघात म्हणजे एक रहस्य आहे.
मराठीच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले व मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाला न्याय्य हक्क देण्यासाठी दोघांनी राजकीय युती जाहीर केली. मराठी माणसाच्या जीवनातील हा भाग्याचा क्षण म्हणून पाहावा लागेल. 20 वर्षांच्या दुराव्यानंतर ठाकरे बंधूंनी कौटुंबिक व राजकीय पातळीवर एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चांगलेच घडले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका त्यामुळे जिंकणे सोपे होईल.
बांगलादेश, कंबोडिया, म्यानमारसह अनेक देशांत हिंदूंवर हल्ले झाले व मंदिरे उद्ध्वस्त केली. भारताचे हिंदुत्ववादी सरकार इतके होऊनही गप्पच राहिले.
भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत ‘91’ पर्यंत कोसळला. ‘भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल, झाली आहे’ असे पालुपद लावणाऱ्यांना रुपयाच्या कोसळण्याने धक्का बसला नाही. रुपया म्हणजे फक्त कागदाचा तुकडा नाही व रुपया घसरतो तेव्हा भारताची प्रतिष्ठा घसरत असते, असे सांगणाऱ्या भाजपने रुपया ‘91’ पर्यंत कोसळला तरी दोन अश्रूही ढाळले नाहीत.
मोदींना 75 वर्षे झाली तेव्हा ते निवृत्त होतील असे वाटले, पण मोदी त्यांच्या पदाला चिकटून राहिले.
लोकशाही आहे?
भारतात लोकशाही राजवट असल्याचे आपण मानतो, परंतु प्रत्यक्षात चार व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षा, वैर, राग-लोभ, अहंकार यांच्यासाठी देशाला कसे वेठीस धरतात याचे चित्र मावळत्या वर्षात दिसले. पक्षहित, राष्ट्रहिताचे विचार गौण ठरले व देशहिताचा तर रोज बळी जातोय. राजकारण फक्त स्वार्थ, कपटीपणा आणि शेवटी हिंसा इतक्यापुरतेच शिल्लक राहिले. लोक महागाई व रोजगारावर बोलू लागतात तेव्हा अयोध्येत धर्मध्वजा फडकवून ‘हिंदू-मुसलमान’सारखे भावनिक विषय उभे केले जातात. नेते, राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयही आपले कर्तव्य विसरत आहेत. देशाचे भवितव्य उज्ज्वल करणे किंवा देशाला अधोगतीला नेणे हे दोन-चार माणसांच्या हाती जाण्याची भारतीय समाज जीवनाची शोकांतिका आपण 2025 वर्षातही पाहिली. 2026 ला वेगळे काही घडेल काय?
घटना वावटळीसारख्या येतात व नष्ट होतात, पण उपयोग काय? मोदी-शहांचे राज्य मोदी-शहा व अदानींसाठी सुरूच राहील. आपण फक्त जय श्रीरामांच्या घोषणा द्यायच्या इतकेच!
ट्विटर – @rautsanjay61
Gmail- [email protected]
Comments are closed.