मनरेगा संपवणे हा गरिबांवर हल्ला आहे.
काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे टीकास्त्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार गरीबविरोधी असून महात्मा गांधी रोजगार हमी योजना या सरकारने संपविली आहे. हा गरिबांच्या पाठीत केलेला वारच आहे, असे टीकास्त्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोडले आहे. ते काँग्रेसच्या येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत भाषण करीत होते. केंद्र सरकार देशातील घटनात्मक संस्थांना कमजोर करीत असून काँग्रेस या प्रवृत्तीविरोधात देशव्यापी संघर्षासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने संसदेत प्रस्ताव संमत करून मनरेगा योजनेचे स्वरुप परिवतर्तीत केले आहे. तसेच या योजनेचे नावही ‘विकसीत भारत जी राम जी’ असे केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली असून भारतीय जनता पक्षाला महात्मा गांधी या नावाचे वावडे असल्याने त्यांच्या नावाने इतकी वर्षे चालविण्यात आलेल्या या योजनेचे नाव आणि स्वरुप बिघडविल्याचा आरोप काँगेसकडून केला जातो.
गांधींच्या प्रतिष्ठेवरच हल्ला
मनरेगा बंद करण्याचा केंद्र सरकारचा हा निर्णय महात्मा गांधी यांच्या प्रतिष्ठेवर आणि सन्मानावरच केलेला हल्ला आहे. महात्मा गांधी यांच्या सर्वोदय संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ही योजना साकारण्यात आली होती. अशा योजनेचा अंत ही सामूहिक नैतिक विफलतेची प्रचिती आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम होणार आहेत. काम करण्याचा अधिकार हा भारताच्या राज्यघटनेच्या मार्गदर्शन तत्वांमध्ये समाविष्ट केला आहे. याच अधिकारावर केंद्र सरकार घाला घालत असून हा घटनेचा अवमानच होय, अशा शब्दांमध्ये त्यांनी केंद्र सरकारला आपल्या भाषणात धारेवर धरल्याचे दिसून आले.
योजनेची जागतिक प्रशंसा
मनरेगा ही योजना गांधीची स्वप्ने साकारण्यासाठी लागू करण्यात आली होती. या योजनेची जगानेही प्रशंसा केली आहे. 2006 मध्ये तत्कालीन नेते मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांनी आंध्र प्रदेशात या योजनेचा प्रारंभ केला होता. ती जगातील सर्वात मोठी रोजगार हमी योजना म्हणून पुढे आली. या योजनेमुळे ग्रामीण भागात गरिबांना अन्नसुरक्षा आणि काम मिळाले. त्यांचे पलायन थांबले आणि ग्रामीण अर्थकारणात मोठी सुधारणा झाली. अशी योजना बंद करण्याचे कोणतेही कारण नव्हते. तथापि, केंद्र सरकारच्या गरीबविरोधी धोरणांमुळे ती बंद करण्यात आली, असे अनेक आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.
देशव्यापी आंदोलन करणार
मनरेगा ही योजना वाचविण्यासाठी काँग्रेस देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याची माहिती खर्गे यांनी दिली. या आंदोलनाचे स्वरुप आणि व्याप्ती यांच्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारने पूर्वी केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधातील संघर्ष यशस्वी झाला होता. तसेच मनरेगा संबंधीचा संघर्षही यशस्वी होईल, असा विश्वास मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला.
पक्षसंघटना अन् निवडणूक सज्जता
काँग्रेसची संघटना देशात सर्वत्र भक्कम करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच 2026 मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत, त्या प्राणपणाने लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ (एसआयआर) अभियानावरही नाराजी व्यक्त करण्यात आली. या अभियानाच्या द्वारे अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीयांची नावे मतदारसूचीतून काढून टाकण्यात येत आहेत. त्याविरोधातही आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मनरेगासंबंधीची स्थिती काय आहे…
मनरेगा ही योजना बंद करण्यात आली आहे, असे काँग्रेसचे म्हणणे असले, तरी प्रत्यक्षात ती बंद करण्यात आलेली नाही. उलट ती अधिक व्यापक करण्यात आली असून रोजगार हमीचे दिवसही प्रतिवर्ष 100 वरून 125 वर नेण्यात आले आहेत. तसेच या योजनेतून साकारल्या जाणाऱ्या कामांची व्याप्तीही वाढविण्यात आली असून ग्रामीण विकासाला त्यामुळे अधिक चालना मिळणार आहे. या योजनेचे नाव आता भिन्न आहे. याचा अर्थ योजना बंद झालेली आहे, असा होत नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या टीकेला भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आले आहे.
परराष्ट्र नीती समान असावी
या बैठकीला शशी थरुर यांचीही उपस्थिती होती. त्यांनी परराष्ट्र धोरणासंबंधी भाष्य केले. परराष्ट्र धोरण हे कोणत्याही राजकीय पक्षाचे असत नाही. तर ते साऱ्या देशाचे असते. त्यामुळे या धोरणाची परिणामकारकता त्याच्या सातत्यावर अवलंबून आहे, असे मतप्रदर्शन त्यांनी त्यांच्या अल्पकालीन भाषणात केले.
कार्यकारिणी बैठकीत अनेक प्रस्ताव
ड मनरेगा योजना वाचविण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याचे संकेत
ड सध्याचे केंद्र सरकार सामाजिक सौहार्दाच्या विरोधात असल्याची टीका
ड ‘एसआयआर’ अभियानामुळे अल्पसंख्य, दलितांची नावे काढली जाणार
ड भविष्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार
Comments are closed.