नितीन नबीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष?
जानेवारी महिन्याच्या मध्यात निवडणूक शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अलिकडेच नियुक्त करण्यात आलेले नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते. पक्षाच्या सूत्रांचा हवाला देत यासंबंधीची चर्चा आता सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी त्यांची नियुक्ती जाहीर होऊ शकते.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड करण्याची प्रक्रिया 18 ते 20 जानेवारी दरम्यान पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जर नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तर ते या पदावर असलेले सर्वात तरुण व्यक्ती ठरतील. त्यांचा कार्यकाळ जानेवारी 2029 पर्यंत राहील. 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे त्यांचा कार्यकाळ वाढवता येऊ शकतो.
15 जानेवारीनंतर देशभरातील प्रदेशाध्यक्षांची दिल्लीत बैठक बोलावण्याची तयारी पक्ष करत आहे. याआधी 2028 मध्ये जे. पी. न•ा यांचीही कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु नंतर त्यांना कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होती.
पक्षशासित राज्यांपैकी अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 37 पैकी 29 राज्यांमध्ये अंतर्गत निवडणुका प् झाल्या आहेत. या राज्यांमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ नामांकनपत्रांचा संच सादर करतील. शिवाय, भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ नामांकनपत्रांचा स्वतंत्र संच देखील सादर करतील. नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ दाखल केलेल्या नामांकन पत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वाक्षऱ्या देखील असतील. नितीन नबीन हे नामांकन दाखल करणारे एकमेव उमेदवार असल्यास भाजपचे मुख्य निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण हे नामांकन पत्रांची छाननी केल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड औपचारिकपणे जाहीर करतील. पक्षपातळीवर होणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेवेळी सर्व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
Comments are closed.