कोल्हापुरात काँगेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मागणी केलेल्या जागा सोडून काँगेसने शुक्रवारी रात्री उशिरा 48 जणांची उमेदवार पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 17 माजी नगरसेवकांना पुन्हा आणि 13 माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांना संधी देण्यात आली आहे. उर्वरित यादी दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, महायुतीकडून अजूनही यादी जाहीर करण्यात आली नसली, तरी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी आज समर्थकांसह अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे.
कोल्हापूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केली. या यादीत 17 माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे. तसेच तेरा माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांतील पत्नी, मुलगी, सून अशांना उमेदवारी दिली आहे. जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक प्रभाव हे निकष या उमेदवारीसाठी लावण्यात आले आहेत. माजी नगरसेवक भोपाल शेटे, त्यांची मुलगी पूजा शेटे, माजी नगरसेवक राहुल माने, त्यांची पत्नी ऋग्वेदा, इंद्रजित बोंद्रे आणि त्यांची पत्नी मयुरी यांनाही उमेदवारी दिली आहे. सात माजी नगरसेवकांची मुले, दोन माजी उपमहापौर तसेच नवीन अठरा चेहऱयांना संधी देण्यात आली आहे. विधानसभेची निवडणूक लढविणारे माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी प्रभाग चारमधून संधी दिली आहे.
दरम्यान, ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्स’, या टॅगलाइनखाली सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत आमदार सतेज पाटील यांनी आज ‘मार्ंनग वॉक’ला ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधत सूचना व समस्या जाणून घेतल्या. कोल्हापूर शहराच्या विकासाबद्दल नागरिकांच्या भावना, संकल्पना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कंडका पाडायचा, आमचं ठरलंय, ख़टक्यावर बोट जाग्याव पलटी अशा अनेक टॅग लाईन राज्यभर गाजल्या आहेत.आता कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं या मोहिमेलाही उदंड प्रतिसाद मिळत आहे.
20 जणांचे अर्ज दाखल; 279 अर्जांची विक्री
उमेदवारी अर्जविक्री आणि दाखल करण्याच्या आज पाचव्या दिवशी एकूण 279 अर्जांची, तर आतापर्यंत एकूण 1 हजार 816 अर्जांची विक्री झाली. आज दिवसभरात 20 इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण 24 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल केलेल्यांमध्ये भाजपकडून कृष्णराज महाडिक, माजी नगरसेवक संजय निकम, प्रशांत वळंजू, शिंदे गटाकडून अमृता प्रसाद वळंजू यांचे दोन अर्ज, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून दिनकर कांबळे यांनी अर्ज दाखल केला आहे. उर्वरित 14 अपक्ष म्हणून अर्ज दाखल झाले आहेत.
महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात
भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कार रेसर कृष्णराज महाडिक यांनी प्रभाग 3 मधून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात अजूनही जागावाटपासंदर्भात कोणताच फॉर्म्युला समोर येत नसल्याने, इच्छुकांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारालाही सुरुवात केली.
Comments are closed.