बॅग पॅकर्स – मुक्ता टॉप
>> चैताली कानिटकर
मुक्ता टॉप हा हिमालयाच्या कुशीत विसावलेला प्रदेश. काहीसा चढणीचा हा ट्रेक सुंदर पर्वतराजी, शांत पायवाटा आणि हिमालयाशी जुळलेले एक गहिरे नाते यांचा सहजसुंदर अनुभव देणारा ठरतो. हिमालयाच्या कुशीत विसावलेला हा प्रदेश. इथल्या प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकेत, पानांच्या सळसळीत आणि मंद धुक्यात एकच कथा तरंगताना ऐकू येते – मुत्तेची कथा. असं म्हणतात की, खूप वर्षांपूर्वी या डोंगररांगांत मुक्ता नावाची एक धाडसी, कोवळी, पण अतिशय तेजस्वी मुलगी राहत होती. एके दिवशी जंगलात गुरे राखायला गेलेली काही मुले अचानक धुक्यात हरवली. आकाश काळवंडले, वाटा अस्पष्ट झाल्या.गावकऱ्यांच्या मनात चिंता दाटून आली. तेव्हा मुक्ता एकटीच त्यांना शोधायला निघाली. तिने दरी-उतार पार केले. काटेरी झुडुपांतून, धुक्यातून मार्ग काढला आणि एका उंच शिखरावर उभी राहून तिने हातातील मशाल उंचावली. जणू आकाशाला भिडणारा आकांक्षेचा अग्निकिरण.
ती उजळती ज्योत पाहून धुक्यात हरवलेली मुले दिशा ओळखू लागली. एकेक पाऊल टाकत ती पुन्हा सुरक्षित गावात पोचली. गावभर प्रकाशाचा उत्सव पसरला. लोक म्हणाले, `या शिखरावरून चमकलेला तो प्रकाशच तर आपल्या लेकरांना परत आणून गेला.’ ..आणि म्हणूनच त्या उंच शिखराला लोकांनी प्रेमाने नाव दिले – `मुक्ता टॉप’… धैर्य, मार्गदर्शन आणि उजेडाचे स्मारक. आज या वाटेने नेणारा ट्रेक आहे मुक्ता टॉप ट्रेक. उत्तराखंडातील डून व्हॅली व हिमालयाच्या निसर्गसंपन्न वनराईमध्ये असलेला मुक्ता टॉप ट्रेक तसा नवीन व ऑफबीट ट्रेक म्हणून ओळखला जातो. हा ट्रेक 6 दिवसांचा असून उंची 11820 फूट व एकूण अंतर 27 किलोमीटर आहे. जानेवारी ते मार्च आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हा ट्रेक करता येतो.
मुक्ता टॉपचा तुमचा प्रवास देहराडूनहून ते कुफलोन या गावापर्यंत ड्राईव्हने सुरू होतो. हे गंगा नदीकाठी वसलेले एक आकर्षक गाव. शहर सोडताच परिसराचे रूपांतर घनदाट जंगले, नद्या आणि उंच पर्वताच्या मोहक भूमीत होते. या मार्गावरील प्रमुख आकर्षण म्हणजे उत्तरकाशी. भागीरथी नदीच्या काठावर वसलेले हे अध्यात्मिक शहर. पर्वतमार्गांतून वळणं घेत वाहणाऱया या नदीचे दृश्य शांत आणि विस्मयकारक आहे. हा रस्ता पाइनच्या जंगलांमधून, टेरेस्ड शेतामधून आणि पर्वतीय गावांमधून जातो.
कुफ्लॉन या बेस कॅम्पमध्ये गावातील शांत वातावरण व गंगा नदीचा शांत आवाज आपली सोबत करतो. दुसरा दिवस कुफ्लॉन ते शिलाधुनी असा 4 तासांच्या ट्रेकिंगचा आहे. ओक, पाइन आणि रोडोडेंड्रॉनच्या झाडांनी भरलेल्या घनदाट जंगलांमधून जाणारा, पण लहानशा चढणीचा हा मार्ग आहे. जंगलातील झाडं, पक्ष्यांची किलबिल आणि दाट पानांच्या मागे लपत फिरणारी खारुताई हे दृश्य भावते. नशिब जोरावर असेल तर झाडांमधून डोलणारे लंगूर, हिमालयीन मोनाल्सदेखील दिसू शकतात. सतत चढाई केल्यानंतर जंगलात वसलेल्या शांत शिलाधुनी कॅम्पसाईटवर पोहोचतो. दाट हिरवळीने वेढलेले हे शांत ठिकाण आराम करण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यात रमण्यासाठी परिपूर्ण आहे.
तिसरा दिवस 6-7 तासांचा ट्रेक शिलाधुनी ते चैथथर असा आहे. ही वाट चढाईची. जसजसे तुम्ही वर चढता तसतसे हवा अधिक ताजी होते. हा मार्ग चढ-उताराचा आहे. वाटेत हंगामानुसार रंगीबेरंगी रानफुलांची उधळण दिसते.
मुक्ता ताल जवळ येताच वातावरण बदलून जाते. इथे कॅम्पसाईटवर पोहोचल्यावर हिमालयीन दृश्यांचा आनंद घेता येतो. हे अंतर कमी आहे, पण पुढील टप्प्याची तयारी करण्यासाठी हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उत्तम आहे. शिखरांच्या मागे सूर्य मावळताच आकाशी रंगांच्या कॅनव्हासमध्ये रूपांतरित होत अखेर ताऱयांचे एक सुंदर दृश्य दिसू लागते. रात्रीच्या स्वच्छ आकाशाखाली अनुभवता येणारी ही शांतता अधिक सुंदर वाटते.
ट्रेकमधील पुढचा दिवस सर्वात महत्त्वाचा, जो ट्रेकचा सर्वात उंच बिंदू असून अंतर 6 तास 6 किमी आहे. मुक्ता ताल ते मुक्ता टॉपपर्यंतचा मार्ग अवघड चढाईचा आहे. बंदर पूंछ, ब्लॅक पीक, बर्फाच्छादित गंगोत्री पर्वतरांगा आणि सुंदर जाओलीसारख्या प्रसिद्ध शिखरे आजूबाजूला दिसतील. हिवाळ्यात भेट देणार असाल तर हाच मार्ग एका मंत्रमुग्ध करणाऱया बर्फाच्छादित मार्गात रूपांतरित होतो. बर्फाळ फांद्या, गोठलेले झरे आणि चमकणारी शिखरे ट्रेकला एक विशेष रूप बहाल करतात. प्रत्येक पाऊल हिवाळ्यातील अद्भुत भूमीतून चालल्यासारखे वाटते. चढाईला थोडा वेळ लागतो, पण मेहनत सार्थकी लागते. मुक्ता टॉपवर पोहोचणे हा सर्वोत्तम अनुभव.
शिखरावर फोटोसेशन झाल्यावर कुआरी कॅम्पकडे उतरण सुरू होते. उतरण सौम्य आहे, परंतु लांब आहे. कुआरी कॅम्पमध्ये पोहोचल्यावर मुक्ता टॉपच्या अविश्वसनीय प्रवासाचा, अनुभवांचा, आठवणींचा आनंद मनात गुंजत राहतो. शेवटचा दिवस सकाळी लवकर कुआरी कॅम्पहून कुफ्लॉनला उतरत सुरू होतो. हा मार्ग 6 किमी असून 6-7 तासांचा आहे. घनदाट जंगलातून उतरणे सोपे आहे. कुफ्लॉनला पोहोचल्यावर पायी प्रवास संपून देहराडूनचा परतीचा प्रवास सुरू होईल.
हा एक निसर्गरम्य आणि चिंतनशील प्रवास आहे. देहराडूनमध्ये पोहोचताच ट्रेक संपेल, परंतु आठवणी तुमच्या सोबत राहतील. सुंदर पर्वत, शांत पायवाटा आणि हिमालयाशी जुळलेले एक गहिरे नाते हे सारे मनात साठवून ट्रेक खऱया अर्थाने पूर्ण होतो.
Comments are closed.