जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपले…, ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची कबुली

जम्मू-काश्मीरमधे 22 एप्रिल 2025 मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला हिंदूस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे सडेतोड उत्तर दिले होते. या मोहिमेमुळे पाकिस्तानची कशी तंतरली, याबाबत आता स्वतः पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी कबुली दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना झरदारी यांनी कबूल केले की, हिंदुस्थाच्या या कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कराचे मोठे अधिकारी आणि स्वतः राष्ट्रपतींनाही आपला जीव वाचवण्यासाठी चक्क बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला होता. हिंदुस्थानने हा हल्ला करण्याच्या 4 दिवस आधीच आम्हाला युद्धाची चाहूल लागली होती, असेही त्यांनी सांगितले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचलेला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थानने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार प्रहार केला होता. या कारवाईदरम्यान पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर कित्येक दिवस बेपत्ता होते. हिंदुस्थानच्या या कारवाईमुळे पाकड्यांची भंबेरी उडाली होती. मात्र त्यांनी याबाबत कधी कबूली दिली नाही. दरम्यान आता झरदारींच्या वक्तव्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. झरदारी म्हणाले की, “माझ्या प्रतिनिधीने येऊन मला सांगितले की सर, युद्ध सुरू झाले आहे, आता बंकरमध्ये चला… झरदारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून पाकिस्तानी यंत्रणा पूर्णपणे हादरून गेल्याचे स्पष्ट झाले. तसेच पाकिस्तानचा खोटेपणा आता उघडा पडला आहे.

झरदारी यांनी दिलेल्या कबुलीसोबतच त्यांनी हिंदुस्थानवा पुन्हा एकदा पोकळ धमक्या देण्याचा प्रयत्न केला. “आम्ही युद्धाच्या मैदानात लढण्यासाठी स्वतः सज्ज आहोत आणि स्वतः शस्त्रे घेऊन प्राणांचे बलिदान देण्यासही मागे हटणार नाही,” असे सांगत त्यांनी ‘गोळीला गोळीने उत्तर देऊ’ असे विधान केले. मात्र, एका बाजूला लष्करासह बंकरमध्ये लपून बसण्याची हतबलता मान्य करणे आणि दुसऱ्या बाजूला शूरपणाचा आव आणणे, यामुळे पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे.

Comments are closed.