निवडणूक आली की आश्वासनांचा पाऊस, नंतर दुर्लक्ष; केडीएमसीतील 27 गावे घालणार मतदानावर बहिष्कार
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांवर निवडणूक जवळ आली की आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. मात्र निवडणूक संपल्यानंतर पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. या पक्षपातीपणाला कडाडून विरोध करण्यासाठी या २७ गावातील ग्रामस्थांनी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांची मनधरणी करण्यासाठी प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे.
काटई येथे पार पडलेल्या २७ गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की २७ गावातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर वर्षानुवर्षे गदा आणली जात आहे. निवडणुका जवळ आल्या की आश्वासनांचा पाऊस पाडायचा आणि निवडणुका संपल्यानंतर या गावांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे, हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही. फक्त मतांसाठी गावात येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा इच्छुक उमेदवाराला २७गावात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी गावांच्या हद्दीत निवडणूक प्रक्रिया राबवू नये, असे ठाम आवाहन संघर्ष समितीने केले आहे.
गावांना वाऱ्यावर सोडले
पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, मालमत्ता कराचा अन्यायकारक बोजा, गावठाण हक्क, विकास आराखड्यातील अन्याय तसेच आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांबाबत २७ गावांना आजही न्याय मिळालेला नाही असा गंभीर आरोप समितीने केला. महापालि का प्रशासन, सत्ताधारी आणि शासनाने जाणीवपूर्वक या गावांना वाऱ्यावर सोडल्याचा ठपका ठेवण्यात आला. नागरिकांच्या संयमाचा अंत झाला आहे. हा निर्णय म्हणजे केवळ इशारा नसून थेट संघर्षाची घोषणा आहे, असेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Comments are closed.