अंधेरीतील चाळीत लागेल्या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

अंधेरी (पूर्व) येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील चाळीतील खोलीत लागलेल्या आगीत गंभीर भाजलेल्या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. वीणा प्रदीप भोईटे अशी मृत महिलेची ओळख असून त्यांच्या संपूर्ण शरीरावर 95 ते 98 टक्के भाजल्या होत्या. त्यांचा 24 डिसेंबर रोजी रात्री 10.03 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आगीत जखमी झालेले इतर दोघे अद्यापही गंभीर अवस्थेत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोघेही आयसीयूमध्ये दाखल आहेत.
ही आग 21 डिसेंबर रोजी रात्री रमाबाई आंबेडकर नगर येथील चाळीतील खोलीत लागली. या घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांसह तिघेजण गंभीर भाजले. वीणा प्रदीप भोईटे (45) या 95 ते 98 टक्के भाजल्या, तर नमदेव काशिनाथ सकपाळ (75) हे 20 ते 25 टक्के भाजले आणि लक्ष्मी नमदेव सकपाळ (70) या 30 ते 32 टक्के भाजल्या. तिन्ही जखमींना प्रथम कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढे कस्तुरबा रुग्णालयाच्या जळीत जखम विभागात हलवण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन कक्षानुसार, ही घटना मुंबई अग्निशमन दलाकडे रात्री 7.16 वाजता नोंदवली गेली आणि रात्री 7.44 वाजता आग विझवण्यात आली. अंधेरी (पूर्व) येथील विजय नगर, रमाबाई आंबेडकर नगर चाळ परिसरातील तळ मजला आणि पहिला मजला अशा रचनेतील खोली क्रमांक 10 मध्ये ही आग लागली. आग विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, कपडे, गाद्या आणि इतर घरगुती साहित्यापुरतीच मर्यादित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments are closed.