स्मृती मंधानाच्या नावावर नवा इतिहास? ‘स्पेशल क्लब’मध्ये एन्ट्रीची सुवर्णसंधी; केवळ 27 धावांची गरज
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर श्रीलंका महिला संघाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारताने दमदार विजय मिळवत मालिकेत अजेय आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील चौथा सामना 28 डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाकडे मोठा ऐतिहासिक पराक्रम करण्याची संधी असेल.
या मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यांत स्मृती मंधानाकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत जोरदार पुनरागमन करण्याची तिची इच्छा असेल. संघाने मालिका आधीच जिंकली असली, तरी मंधानासाठी वैयक्तिक विक्रमाच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
स्मृती मंधानाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या फलंदाजीची छाप पाडली आहे. वनडेत तिच्या नावावर 5322 धावा असून, टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत तिने 4022 धावा केल्या आहेत. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्येही मंधानाने 629 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या एकूण धावांचा आकडा सध्या 9973 इतका आहे.
जर मंधानाने श्रीलंका महिला संघाविरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात आणखी 27 धावा केल्या, तर ती महिला क्रिकेटमधील 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करेल. हा टप्पा गाठणारी ती आतापर्यंतची केवळ चौथी महिला क्रिकेटपटू आणि भारताकडून दुसरी खेळाडू ठरेल. याआधी हा पराक्रम भारताची माजी कर्णधार मिताली राज, न्यूझीलंडची सूजी बेट्स आणि इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स यांनी केला आहे.
महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मृती मंधाना सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्यापुढे केवळ सूजी बेट्स असून, त्यांच्या नावावर 4716 धावा आहेत. मंधाना ही महिला टी20 मध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारी दुसरीच फलंदाज आहे. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे, जिने आतापर्यंत 3700 हून अधिक धावा केल्या आहेत.
Comments are closed.