कसोटीतील खराब कामगिरीमुळे गौतम गंभीरचे प्रशिक्षकपद जाणार? बीसीसीआयने दिले उत्तर!
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची अवस्था बिकट झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला पहिल्यांदाच मायदेशात मानहानी पत्करावी लागली, तर ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सलग तिसऱ्यांदा जिंकण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले.
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघही भारताचा बालेकिल्ला भेदण्यात यशस्वी ठरला. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमधील टीम इंडियाची ही लाजिरवाणी कामगिरी पाहून गौतम गंभीरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गंभीरच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची कसोटी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, अशा अफवा देखील पसरत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयने (BCCI) पहिल्यांदाच मौन सोडले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना गौतम गंभीरला कसोटी प्रशिक्षकपदावरून हटवण्याच्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या. त्यांनी या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. सैकिया म्हणाले, “गौतम गंभीरबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. त्याचबरोबर इतर कोणत्याही प्रशिक्षकाशी संपर्क साधण्यात आलेला नाही. या गोष्टी केवळ अफवा आहेत आणि दुसरे काहीही नाही.”
गंभीर त्याच्या करारानुसार सध्या भारतीय संघासोबत काम करत राहील आणि सध्या त्याच्या पदाला कोणताही धोका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर, बीसीसीआय सचिवांनी कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्याची शक्यताही स्पष्टपणे फेटाळली आहे.
क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये टीम इंडिया सध्या मोठ्या संघर्षाचा सामना करत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची फलंदाजी फिरकीपटूंसमोर सपशेल अपयशी ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टीम इंडियाला 2-0 ने मालिका गमवावी लागली होती. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 408 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. धावांच्या बाबतीत हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला होता.
Comments are closed.