कहरच..! स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, 10000 धावांचा टप्पा पार

भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघांमधील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये फलंदाजीने चांगली कामगिरी करू न शकलेली भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना चौथ्या सामन्यात तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, पूर्वी फक्त तीन महिला खेळाडूंचा समावेश असलेल्या एका खास क्लबमध्ये सामील झाली.

स्मृती मानधना महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाजांपैकी एक मानली जाते, तिने तिन्ही स्वरूपात तिच्या कौशल्याचे प्रदर्शन केले आहे. श्रीलंकेच्या महिला संघाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात तिने 27 धावा करताच, तिन्ही स्वरूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावा पूर्ण केल्या. यासह, स्मृती मानधना महिला क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारी केवळ चौथी खेळाडू आणि ही कामगिरी करणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. स्मृती मानधनापूर्वी, मिताली राज, सुझी बेट्स आणि शार्लोट एडवर्ड्स यांनी ही कामगिरी केली होती.

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

मिताली राज (भारत) – १०८६८ धावा
सुझी बेट्स (न्यूझीलंड) – 10652 धावा
शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड) – 10273 धावा
स्मृती मानधना (भारत) – 10030* धावा
स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज) – 9301 धावा

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी राहिली आहे: तिने 117 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 48.38 च्या सरासरीने 5322 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिने 157 सामन्यांमध्ये 29.87 च्या सरासरीने 4050 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मानधनाने सात कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 57.18 च्या सरासरीने 629 धावा केल्या आहेत. स्मृती मानधन सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

Comments are closed.