सूर्या तामिरी आणि ऋत्विक यांनी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेतेपद पटकावले.

वृत्तसंस्था/ विजयवाडा

येथे झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सूर्या करिश्मा तमिरी व रुत्विक संजीवी यांनी अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले.

19 वर्षीय सूर्या तमिरीने जेतेपदासाठी झालेल्या लढतीत तन्वी पत्रीवर 17-21, 21-12, 21-14 अशी मात केली. ही लढत सुमारे एक तास रंगली होती. पहिल्या गेमच्या मध्यावर तन्वीने नियंत्रण राखत तमिरीला वारंवार चुका करण्यास भाग पाडले होते. दुसऱ्या गेममध्ये 6-5 वर असताना तमिरीने परतीचा फटका नेटवर मारला. पण सर्व्हिस पंचांनी फटक्याच्या उंचीच्या आधारावर त्याला फॉल्ट ठरविले. यानंतर मात्र तमिरीने ताबा मिळवित सलग सात गुण घेत हा गेम जिंकत बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये तमिरीने तन्वीला दीर्घ रॅलीजमध्ये गुंतवत थकवले. तन्वीने तिच्या वेगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते शक्य झाले नाही. 15-14 नंतर सलग सहा गुण घेत तमिरीने गेमसह सामना संपवत जेतेपद निश्चित केले.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रित्विकने भक्कम बचाव व संयम यावर भर  देत भरत राघववर विजय मिळविला. पहिला गेम सहजपणे जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भरतने 9-5 अशी बढत घेतल्यानंतर रुत्विकवर दबाव आला होता. रित्विकने नंतर सलग सहा गुण घेत पुन्हा आघाडी घेतली तेव्हा तो हा गेम सहज जिंकणार असे वाटले होते. पण दोन चुकीच्या कॉल्समुळे भरतला पुनरागमनाची संधी मिळाली. त्याला एक गेमपॉईंटही मिळाला होता. पण रुत्विकने समतोल ढळू न देता आपल्या गेमप्लॅनला चिकटून राहत गेमसह सामना 39 मिनिटांत संपवला. त्याने ही लढत 21-14, 21-18 अशी जिंकत जेतेपद पटकावले. 2024 मध्ये रित्विकने ओडिशा मास्टर्स स्पर्धाही जिंकली होती.

महिला दुहेरीत शिखा गौतम व अश्विनी भट यांनी द्वितीय मानांकित प्रिया देवी के. व श्रुती मिश्रा यांच्यावर 21-14, 21-18 अशी मात करून जेतेपद मिळविले. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित हरिहरन अम्साकरुणन व आर. रुबन कुमार यांनी मिथिलेश पी. कृष्णन व प्रेजन यांच्यावर 21-17, 21-12 अशी मात केली. मिश्र दुहेरीत सात्विक रे•ाr व राधिका शर्मा या द्वितीय मानांकित जोडीने अग्रमानांकित आसित सूर्या व अमृता पी. यांचा 21-9, 21-15 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.

Comments are closed.