आयएनएस वागशीरमधून राष्ट्रपतींचा सागरी प्रवास.

कारवारमधील सी-बर्ड नौदल तळाला भेट : राफेल उड्डाणानंतर अनुभवला आणखी एक थरार

प्रतिनिधी / कारवार

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी येथून जवळच्या सी-बर्ड नौदल प्रकल्पातील बंदरातून ‘आयएनएस वागशीर’ या पाणबुडीतून समुद्री प्रवासाचा थरार अनुभवला. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या. तसेच आतापर्यंत असा थरार अनुभवणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी बंगालच्या उपसागरामधून आयएनएस सिंधू रक्षक या पाणबुडीतून सुमारे साडेतीन तास प्रवास केला होता. गेल्या ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेलचा थरार अनुभवला होता. तत्पूर्वी 8 एप्रिल 2023 रोजी त्यांनी इंडियन एअरफोर्सच्या सुखोई 30 मधून उड्डाण केले होते.

राष्ट्रपती मुर्मू सध्या गोवा, कर्नाटक आणि झारखंड या तीन राज्यांच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांचे गोव्याहून सी-बर्ड नौदल प्रकल्पस्थळी आगमन झाले. त्यांचे स्वागत कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. यावेळी मत्स्य आणि बंदर खात्याचे मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, चीफ ऑफ द नेवल स्टाफ अॅडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी, अॅडमिरल विक्रम मेनन – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग कर्नाटक नेवल एरिया, प्रादेशिक आयुक्त जानकी, कारवारच्या जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, अतिरिक्त डीजीपी हितेंद्र, आयजीपी अमन सिंग, कारवार जिल्हा पोलीसप्रमुख दीपन एम. एन. आदी उपस्थित होते.

पाणबुडीची घेतली सविस्तर माहिती

राष्ट्रपतींची ही भेट भारतीय नौदलाच्या क्षमता आणि स्वावलंबी भारताच्या संरक्षण उत्पादन कार्यक्रमाचे एक शक्तिशाली प्रतीक मानली जाते. भेटीदरम्यान, राष्ट्रपती मुर्मू यांना पाणबुडीच्या ऑपरेशनल क्षमता, गुप्त वैशिष्ट्यो आणि शस्त्र प्रणालींबद्दल माहिती देण्यात आली. त्यांना भारतीय नौदलाच्या पाण्याखालील युद्ध नेटवर्कबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. ही उ•ाण अनेक प्रकारे ऐतिहासिक होती.

आशिया खंडातील सर्वात मोठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सी-बर्ड नाविक दल प्रकल्प येथून जवळच्या आरगा येथे आकार घेत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा यापूर्वीच पूर्ण झाला आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पा कारवार आणि अंकोला तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर आकार घेत आहे. नौदल सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तिन्ही लष्करी दलांच्या प्रमुख असलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी देशी बनावटीच्या कलावरी क्लासची पाणबुडी ‘आयएनएस वागशीर’मधून अरबी समुद्रातून प्रवास केला. ही पाणबुडी कलावरी क्लासची सहावी आणि शेवटची आहे. ही पाणबुडी फ्रान्समधून ट्रान्स्फर केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मजगाव येथील डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडकडून तयार करण्यात आली आहे. डिझेल इंजिनवर चालणाऱ्या या पाणबुडीचा वापर इंटेलिजन्स, पाळत ठेवण्यासाठी आणि टेहळणीसाठी केला जातो.

मुर्मू यांच्या सी-बर्ड प्रकल्पाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कारवार तालुक्यातील माजाळीपासून अंकोला तालुक्यातील हारवाडपर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मासेमारीवर बंदी घालण्यात आली होती. द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रविवारी सी-बर्ड प्रकल्प स्थळावर दाखल होणाऱ्या सिव्हिलीयन आणि ठेकेदारी कामगारांना, मजुरांना सुटी दिली होती. प्रकल्पस्थळी हायअलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे नौदलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी मुक्काम ठोकला होता. किनारपट्टी सुरक्षितता दल, नौदल कर्मचारी, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेचे कर्मचारी राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर बारीक नजर ठेवून होते. सी-बर्डच्या दौऱ्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडला रवाना झाल्या.

Comments are closed.