त्रिपुरातील विद्यार्थ्याची डेहराडूनमध्ये हत्या करण्यात आली.
वंशद्वेषी टिप्पणीला विरोध केल्याने गमावला जीव
वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये वंशद्वेषी टिप्पणीला विरोध केल्यावर एका आदिवासी विद्यार्थ्याची जबर मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. हा मृत विद्यार्थी त्रिपुरा येथील होता आणि त्याचे नाव अंजेल चकमा होते. अंजेल हा देहरादूनच्या जिज्ञासा विद्यापीठात एमबीएच्या अंतिम वर्षात शिकत होता. अंजेलवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, यानंतर तो अनेक दिवसांपर्यंत रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता.
देहरादूनमध्ये 9 डिसेंबर रोजी अंजेल हा स्वत:चा भाऊ मायकलसोबत घराबाहेर पडला होता, त्यावेळी काही मद्यधुंद अवस्थेतील लोकांनी त्यांना उद्देशून वंशद्वेषी टिप्पणी केली होती. या लोकांनी अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर केला होता. दोन्ही भावांनी याला विरोध केला असता संबंधित लोकांनी मारहाण सुरु केली होती. यात अंजेलच्या पोटात चाकूने वार करण्यात आला होता. जखमी अंजेलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे त्याचा मृत्यू झाला आहे.
अंजेलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसह अनेक विद्यार्थी संघटनांनी केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तसेच ईशान्येतील युवांना उद्देशून होणाऱ्या वांशिक टिप्पणीच्या समस्येवर कठोर पावले उचलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Comments are closed.