निवडणुकीसाठी पालिकेचे 50 हजार कर्मचारी तैनात, प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर प्रणाली
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेचे तब्बल 50 हजार कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी पालिकेकडून या कर्मचारी-अधिकाऱयांना ‘मास्टर ट्रेनिंग प्रणाली’च्या माध्यमातून मास्टर ट्रेनर प्रशिक्षण देणार आहेत. निवडणूक प्रक्रियेचा व्यापक अनुभव असलेले अधिकारी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या 15 जानेवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी पालिकेच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱया मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा आज विशेष बैठकीतून घेण्यात आला. 29 डिसेंबर ते 3 जानेवारी 2026 आणि 5 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतदान प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्था तसेच तक्रार निवारण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे काटेकोर पालन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे सहआयुक्त शंकरवार यांनी सांगितले.
या ठिकाणी होणार प्रशिक्षण
महानगरपालिका कार्यक्षेत्रात परिमंडळ क्षेत्रनिहाय सात विविध ठिकाणी प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये अण्णाभाऊ साठे सभागृह, भायखळा, ना. म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा, करी रोड, लोअर परळ, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय सभागृह, शीव पूर्व, बालगंधर्व सभागृह, लिंक रोड, वांद्रे पश्चिम, मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले, महाकवी कालिदास नाट्यगृह , मुलुंड पश्चिम आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृह, बोरिवली पश्चिम येथे प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

Comments are closed.