भारताने बांगलादेशचा दावा फेटाळून लावला.
उस्मान हादीचे मारेकरी भारतात घुसले नसल्याचे बीएसएफचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, ढाका
बांगलादेशातील शरीफ उस्मान हादीचे मारेकरी भारतात घुसले असल्याचा बांगलादेश पोलिसांचा दावा मेघालयच्या सुरक्षा संस्थांनी रविवारी फेटाळून लावला. बांगलादेश पोलिसांचा हा दावा दुर्दैवी आणि दिशाभूल करणारा असल्याचे भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) स्पष्टपणे म्हटले आहे. हादी हत्या प्रकरणातील दोन प्रमुख संशयित स्थानिक साथीदारांच्या मदतीने हलुआघाट सीमेवरून मेघालयात घुसल्याचे वक्तव्य ढाका महानगर पोलीस अधिकाऱ्याने केले होते.
हलुआघाट सेक्टरमधून कोणीही आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मेघालयात घुसल्याचा कोणताही पुरावा नाही. बीएसएफने अशी कोणतीही माहिती पाहिलेली नाही किंवा त्यांना मिळाली नाही. बांगलादेशकडून केले जात असलेले दावे दुर्दैवी आणि दिशाभूल करणारे आहेत, असे मेघालयचे बीएसएफ प्रमुख महानिरीक्षक ओपी उपाध्याय स्पष्ट केले आहे. तसेच मेघालय पोलिसांनीही बांगलादेशचे आरोप फेटाळले आहेत. गारो हिल्स परिसरात संशयितांच्या उपस्थितीच्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी कोणतेही इनपुट किंवा गुप्तचर माहिती मिळालेली नाही. स्थानिक पोलीस युनिट्सना अशा प्रकारची कोणतीही हालचाल आढळलेली नाही, असे मेघालयातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यासंबंधी केंद्रीय एजन्सींशी समन्वय सुरू असल्याचेही सदर अधिकाऱ्याने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेले कर्मचारी नेहमीच सतर्क असतात. विशेषत: शेजारील देशात सुरू असलेल्या अशांतता आणि अस्थिर परिस्थिती लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी भारतीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. सर्व प्रदेशांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सतत लक्ष ठेवले जात आहे. सीमापार बेकायदेशीर हालचालींचा कोणताही प्रयत्न त्वरित शोधून त्यावर कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चार बीएसएफने केला आहे.
बांगलादेश पोलिसांचा दावा
ढाक्यातील अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे आणि ऑपरेशन्स) एस. एन. मोहम्मद नजरुल इस्लाम यांनी पत्रकार परिषद घेत भारतावर संशय व्यक्त केला होता. संशयित फैसल करीम मसूद आणि आलमगीर शेख हे स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने भारतीय सीमेवरून मेघालयात दाखल झाल्याचे त्यांनी म्हटले होते. सीमा ओलांडल्यानंतर ते प्रथम पूर्ती नावाच्या व्यक्तीला भेटले. त्यानंतर सामी नावाचा टॅक्सी चालक त्यांना मेघालयातील तुरा येथे घेऊन गेला, असेही ते म्हणाले. मात्र, दोन्ही संशयित भारतात कधी घुसले हे बांगलादेशी अधिकाऱ्याने स्पष्ट केले नाही.
Comments are closed.