जसप्रीत बुमराहला कशाची आहे आवड? अक्षर पटेलने उघड केले मोठे गुपित

मैदानावर आपली अचूक गोलंदाजी आणि ‘पिन पॉइंट ॲक्युरसी’साठी प्रसिद्ध असलेला भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याबद्दल एक रंजक माहिती समोर आली आहे. बुमराहची ही अचूकता खेळाच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये पाहायला मिळते. चाहत्यांना वाटते की बुमराहला फक्त क्रिकेटचे वेड आहे, मात्र आता हे समोर आले आहे की क्रिकेटप्रमाणेच त्याला आणखी एका गोष्टीची प्रचंड आवड आहे. टीम इंडियाचा टी20 उपकर्णधार अक्षर पटेलने याबद्दलचा खुलासा केला आहे. एका यूट्यूब व्हिडिओमध्ये बोलताना अक्षरने सांगितले की, बुमराहला परफ्यूमची जबरदस्त आवड आहे आणि त्याच्याकडे परफ्यूमचे खूप मोठे कलेक्शन आहे.

‘2 स्लॉगर्स’ (2 Sloggers) या यूट्यूब चॅनेलशी संवाद साधताना अक्षर पटेलने बुमराहच्या या छंदाबद्दल सविस्तर सांगितले. बुमराहने परफ्यूमचे कलेक्शन तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचे अक्षरने नमूद केले. बुमराह या बाबतीत इतका चोखंदळ आहे की, तो कोणताही परफ्यूम केवळ वासावरून खरेदी करत नाही, तर प्रत्येक बाटली विकत घेण्यापूर्वी त्यावर सखोल संशोधन करतो. अक्षर म्हणाला की, जिथे टीम इंडियाचे इतर खेळाडू केवळ सुगंध पाहून परफ्यूम घेतात, तिथे बुमराह त्यामध्ये तेलाचे प्रमाण (oil percentage) किती आहे आणि प्रत्येक बाटलीमध्ये परफ्यूमचे नेमके स्वरूप काय आहे, हे तपासून पाहतो.

या व्हिडिओमध्ये युट्यूबरने गंमतीने विचारले की, “हा जसप्रीत बुमराहचा निवृत्तीनंतरचा प्लॅन तर नाही ना?” त्यावर हसत अक्षर म्हणाला, “जस्सी भाई बघून घ्या, पार्टनरशिप करून टाका.” या संवादादरम्यान अक्षरने बुमराहच्या मैदानाबाहेरील आयुष्याबद्दल अशा अनेक वैयक्तिक गोष्टी सांगितल्या, ज्यातून बुमराहच्या छंदांची माहिती मिळते.

Comments are closed.