'शुबमन गिल तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार…', या माजी दिग्गजाने केले मोठे विधान!

इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसर याने शुबमन गिलबद्दल एक असे विधान केले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पनेसरच्या मते, गिल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार पदासाठी योग्य नाही. ANI शी बोलताना पनेसरने शुबमन गिलच्या टॅलेंटचे कौतुक केले, पण असेही म्हटले की सामन्यांदरम्यान तो ‘आळशी शॉट्स’ खेळतो. पनेसर पुढे म्हणाला की, “विराट कोहलीची तीव्रता (Intensity) आणि आक्रमकता मैदानावर स्पष्टपणे दिसते, पण गिल तसे करू शकत नाही. तो एक निष्काळजी क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे कौशल्य खूप आहे, पण तो खेळात आळशी शॉट्स खेळू लागतो. विराटची ऊर्जा तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने दिसते, जी गिलमध्ये दिसत नाही. तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सांभाळणे हे त्याच्यासाठी खूप मोठे ओझे ठरेल, त्यामुळे तो सर्व फॉरमॅटचा कर्णधार बनू शकत नाही.”

महत्त्वाची बाब म्हणजे, शुबमन गिल सध्या वनडे आणि कसोटीत भारताचे नेतृत्व करतो, तर सूर्यकुमार यादव टी20 मध्ये भारताचा कर्णधार आहे. अलीकडेच टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात शुबमन गिलचा समावेश करण्यात आलेला नाही, तसेच त्याला उपकर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आहे. यापूर्वी जेव्हा गिलला टी20 चा उपकर्णधार बनवण्यात आले होते, तेव्हा असा अंदाज लावला जात होता की भविष्यात तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये कप्तानी करेल.

दुसरीकडे, भारतीय कसोटी संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संघर्ष करताना दिसत आहे. गंभीर यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला न्यूझीलंड (3-0) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (2-0) अशा दोन कसोटी मालिकांमध्ये ‘व्हाईटवॉश’चा सामना करावा लागला आहे. जेव्हा पनेसरला गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, “गंभीर हा व्हाईट-बॉल क्रिकेटसाठी एक चांगला प्रशिक्षक आहे कारण त्या फॉरमॅटमध्ये तो यशस्वी ठरला आहे. गंभीरने रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये रेड-बॉल प्रशिक्षक बनायला हवे आणि कसोटी क्रिकेटमध्ये संघ कसा तयार करावा, यासाठी रणजी ट्रॉफीच्या प्रशिक्षकांशी चर्चा करायला हवी.”

Comments are closed.