गौतम गंभीरला प्रशिक्षकपदावरून हटवणार? बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी स्पष्टच सांगितलं!
गेल्या काही दिवसांपासून गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून (Head Coach) हटवले जाणार असल्याच्या अफवांना उधाण आले होते. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानात कसोटी मालिका गमावल्यामुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC 2025) फायनलमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्यानंतरही कसोटीतील खराब कामगिरी सुरूच राहिल्याने गंभीरची नोकरी धोक्यात असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
राजीव शुक्ला यांनी ‘ANI’ या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले की, गौतम गंभीरला पदावरून हटवले जाणार नाही. ते म्हणाले, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल (Head Coach of team india) मीडियामध्ये ज्या काही अफवा पसरत आहेत, त्याबाबत मी स्पष्ट करू इच्छितो की, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी आधीच सांगितले आहे की गंभीरला हटवण्याचा किंवा नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्याचा आमचा कोणताही विचार नाही.
गौतम गंभीरला काढले जाणार असल्याच्या बातम्या निव्वळ खोट्या असल्याचे बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया (Devjit Sakiya) यांनी आधीच म्हटले होते. ज्या प्रसारमाध्यमांनी ही चुकीची माहिती पसरवली, त्यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. गंभीरला हटवण्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसून ही केवळ एक ‘मनघडंत कथा’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता लक्ष 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपवर सध्या भारतीय संघ कसोटीतील अपयश विसरून पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता आणि आता हे विजेतेपद टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान संघासमोर आहे. 2026 चा टी-20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका (India and Shrilanka) यांच्यात 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे.
Comments are closed.