गंभीरचं कसोटी प्रशिक्षकपद जाणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला, बीसीसीआयनं मौन सोडलंं

नवी दिल्ली : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून कसोटी क्रिकेटमधील जबाबदारी काढून घेतली जाणार असल्याच्या चर्चा वाढल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रशिक्षक पद व्हीव्हीएस लक्ष्मणला दिलं जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, बीसीसीआयनं पुन्हा एकदा गौतम गंभीरवर विश्वास कायम ठेवला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गौतम गंभीरला हटवण्याचं कोणतंही नियोजन नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआयनं अफवा फेटाळल्या

गौतम गंभीरनं भारताचं मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर भारतानं वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी संमिश्र राहिली आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाला मायदेशात पराभव स्वीकारावा लागला. तर, ऑस्ट्रेलियात देखील भारतानं कसोटी मालिकेत पराभवाचं तोंड पाहिलं. यामुळं भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता.

इंग्लंडमध्ये गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात भारतानं कसोटी मालिका बरोबरीत सोडवली. त्यानंतर भारतात झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धचे दोन्ही सामने टीम इंडियानं जिंकले. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही कसोटी सामन्यात घरच्या मैदानावर भारताचा पराभव झाला. त्यामुळं गौतम गंभीरचं कसोटीमधील प्रशिक्षकपद जाणार असल्याच्या पुन्हा चर्चा सुरु झाल्या. मात्र, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक पदावरुन हटवलं जाणार नसल्याचं म्हटलं. एएनआयसोबत बोलताना ते म्हणाले की गौतम गंभीरबाबत ज्या अफवा सुरु आहेत, त्याबद्दल स्पष्टपणे सांगायचं आहे की गौतम गंभीरला हटवलं जाणार नाही. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी यापूर्वीच गौतम गंभीरला हटवलं जाण्याचा किंवा नवा प्रशिक्षक नमण्याचा प्लॅन नाही असं म्हटलं.

देवजीत सैकिया काय म्हणाले?

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी गौतम गंभीरला हटवलं जाणार असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं म्हटलं. सैकिया यांनी गंभीरबाबत बातम्या पसरवणाऱ्यांवर टीका केली. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी गौतम गंभीरला हटवण्याचा कोणताही प्लॅन नाही, त्यासंदर्भातील कोणत्याही बातम्यांमध्ये तथ्य नाही, त्या फक्त अफवा आहेत, असं सैकिया म्हणाले.

कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरी मागं टाकून पुढं जाण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. भारतानं 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता.  आता 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान भारतापुढं आहे. 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्याकडून केलं जाणार आहे. टी 20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.