आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा
मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी (BMC Election) अखेर आज भाजप, शिवसेनेसह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. त्यामुळे, गेल्या 5 दिवसांपासून चर्चेत असलेले इच्छुक आणि तयारीत असलेल्या भावी उमेदवारांना चित्र स्पष्ट झालं आहे. शिवसेना उबाठा (Shivsena) पक्षाकडूनही आज कुठलीही यादी जाहीर न करता उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये, माहिम आणि वरळी (Aditya Thackeray) मतदारसंघातील वार्डमधून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वार्ड क्रमांक 194 मध्ये कोणाला तिकीट मिळणार याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर येथून शिवसेना उबाठा पक्षाला उमेदवारी देण्यात आली असून मनसेच्या संतोष धुरी यांची घोर निराशा झाली आहे. येथून, आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदेंना तिकीट मिळाले. तर, वरळी मतदारसंघातील वार्ड 196 मधून पद्मजा चेंबूरकर यांना शिवसेनेनं उमदेवारी दिली. त्यामुळे, ठाकरे गटातही नाराजीचे सूर उमटले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभेत निष्ठावंतांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. शिवसेनेच्या तिकीटवाटपानंतर म्हणजेच उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानंतर इच्छुक शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवल्याने ठाकरे गटासमोर आपल्याच लोकांचे मोठे आव्हान असणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 196 महिलांसाठी खुला झाल्यामुळे विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या जागी त्यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांना शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी आकर्शिका बेकल पाटील, सूर्यकांत कोळी आणि संगीता जगताप यांच्या नावांची येथील वार्डातून जोरदार चर्चा होती. त्यामुळे, हे सर्वच इच्छुक उमेदवार नाराज झाल्याचे समजते.
शिवसेना उबाठा पक्षात कार्यरत असलेले आकर्शिका पाटील युवा सेना विभाग अधिकारी असून त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसाठी वरळीतील हाय राईज इमारतीतील उच्चभ्रू मतरदारांची जबाबदारी होती. तर, संगीता जगताप महिला शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे, त्यांनाही येथील वार्डातून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, पद्मजा चेंबुरकर यांचे तिकीट निश्चित झाल्याने, पक्षातील नेत्यांच्या नातेवाईकांमुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याने वरळीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे नाराजी दूर करतील का?
दरम्यान, याच नाराजीचा पुढचा अध्याय म्हणजे वरळी कोळीवाड्यातील सूर्यकांत कोळी या शाखाप्रमुखाने हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूरकर यांच्याविरोधात पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे, नाराज आणि बंडखोरांचे मोठे आव्हान आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षापुढे असून आदित्य ठाकरे ही नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील का, ते पाहावे लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.