टी-20 वर्ल्ड कप संघातून डावलले जाताच यशस्वी जयस्वालला रोहित शर्माची आठवण!सांगितला हिटमॅनचा तो खास किस्सा
यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) टीम इंडियासाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, तरीही सध्या त्याची जागा फक्त कसोटी (Test) संघातच पक्की मानली जात आहे. टी-20 संघातून तो सध्या दूर आहे आणि याच कारणामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याला संधी मिळाली नाही. संघातून बाहेर असताना आता यशस्वी जयस्वालला रोहित शर्माची आठवण येत असून, त्याने ‘हिटमॅन’शी संबंधित एक जुना किस्सा शेअर केला आहे.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी डावाची सुरुवात केली आहे. विमल कुमार यांना दिलेल्या एका मुलाखतीत यशस्वीने रोहितच्या सल्ल्याबद्दल सांगितले की, (Yashsvi jaiswal on Rohit Sharma) रोहित भाईने मला अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तो नेहमी म्हणायचा ‘तू मोकळेपणाने खेळ, मैदानात जाऊन स्वतःवर विश्वास ठेवून तुझे शॉट्स मार. पण एकदा का तू सेट झालास, तर त्या खेळीचे मोठ्या शतकात रूपांतर करण्याचा प्रयत्न कर’. यशस्वीने त्याच्या शेवटच्या एकदिवसीय (ODI) सामन्यात शानदार शतक झळकावले होते, तरीही सध्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळवणे कठीण जात आहे. आता वनडेमध्ये रोहित शर्मासोबत शुबमन गिल (Shubman gill) सलामीला येताना दिसणार आहे.
यशस्वी जयस्वालने रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळची आठवण सांगताना तो म्हणाला, रोहित भाईनी मला माझ्या पदार्पणाच्या (Debut) 15 दिवस आधीच कल्पना दिली होती. तो म्हणाला होता की, मी तुला अचानक आदल्या दिवशी सांगणार नाही की तू खेळणार आहेस. मी तुला 15 दिवस आधीच सांगत आहे की तू खेळणार आहेस, त्यामुळे स्वतःला तयार कर. आपण एकत्र सराव करू आणि चांगली कामगिरी करू.’अशी त्याची विचारसरणी होती.
Comments are closed.