निवडणूक कामाच्या सक्तीमुळे जे.जे. रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडणार, शेकडो डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या

वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपू नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही मुंबईत सर जे.जे. समूह रुग्णालयांच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना महानगरपालिका निवडणूक कामासाठी सक्ती केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने तसे आदेश दिले असून सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना त्यासंदर्भात मेसेजही पाठवले जात आहेत. आश्चर्य म्हणजे महापालिका रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना यातून सूट देण्यात आली असून फक्त जे.जे. रुग्णालयासाठी निवडणुकीचे काम बंधनकारक करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. परिणामी जे.जे. रुग्णालयातील रुग्णसेवा व अध्यापनाचे काम कोलमडून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

वैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडते. निवडणूक आयोगाच्या 7 जून 2023 च्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व परिचारिका यांना निवडणूक कामाकरिता सूट देण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. सर जे.जे. समूह रुग्णालयांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोज हजारो गोरगरीब गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच रुग्णालयाच्या ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम, डी.एम.एल.टी. व प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. डॉक्टर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कर्मचारी वर्ग त्या कामात सातत्याने व्यस्त असतो. त्यांना निवडणुकीच्या कामाला सक्तीने जुंपले गेले तर रुग्ण सेवा आणि अध्यापनाच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

1500 दाखल रुग्णांच्या जिवाला धोका

सर जे.जे. समूह रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय तपासण्या करणारे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, महाविद्यालयाचे प्रशासकीय काम पाहणारा कर्मचारी वर्ग अशा 134 जणांना निवडणूक कामासाठी हजर राहण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे प्रशासक व आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यासंदर्भात सर्वांना वैयक्तिक मेसेजही पाठवण्यात येत आहेत. जे.जे. समूह रुग्णालयातील एकटय़ा जे.जे. रुग्णालयात 1800 खाटा आहेत. सध्याच्या घडीला तिथे 1700 रुग्ण दाखल आहेत. 300 रुग्ण अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स आणि कर्मचारी रुग्णालयाचे काम सोडून निवडणुकीच्या कामाला गेले तर या रुग्णांच्या जिवाला धोका उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

रुग्णहितासाठी आदेश रद्द करा, अधिष्ठातांची विनंती

जे.जे. रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व रुग्णसेवेशी निगडीत इतर कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामाचे आदेश त्वरित रद्द करावेत अशी विनंती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे केली आहे. सद्यस्थितीत जे.जे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कर्मचारी वर्ग अतिशय अल्प आहे. त्यांना निवडणूक कामकाजाकरिता पाठवल्यास रुग्णसेवेत बाधा निर्माण होऊ शकते, याकडे डॉ. भंडारवार यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

Comments are closed.