सराईत मोटरसायकल चोर गजाआड

सराईत मोटरसायकल चोराला मालाड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. प्रथम बोम्मा असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोटरसायकल जप्त केल्या आहेत. प्रथमच्या अटकेने मालाड, विनोबा भावे नगर आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्यातील अशा चार गुह्यांची उकल करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे.

मालाड पश्चिमच्या न्यू लिंक रोड येथून एक मोटरसायकल 20 डिसेंबरला चोरी झाली होती. मोटरसायकल चोरीप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील 40 ते 50 सीसीटीव्ही पॅमेऱयाची तपासणी केली. तसेच आणखी कुठून मोटरसायकली चोरी होतात याची माहिती घेऊन तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान एका महत्त्वाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले. मोटरसायकल चोरणारी एकच व्यक्ती असल्याचे उघड झाले.

मोटरसायकल चोर हा मालवणी परिसरात जात असल्याचे उघड झाले. चोरटय़ाला पकडण्यासाठी पोलिसांनी तेथे सापळा रचला. अखेर सापळा रचून पोलिसांनी प्रथमच्या मुसक्या आवळल्या. त्याने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जोगेश्वरी, विनोबा भावे नगर परिसर येथून मोटरसायकल चोरीची कबुली दिली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

Comments are closed.