क्विंटन डी कॉकचा टी20 मध्ये मोठा पराक्रम, असा विक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉक सध्या SA20 मध्ये खेळत आहे. तो या स्पर्धेत सनरायझर्स ईस्टर्न केपचा भाग आहे. सध्या सुरू असलेल्या लीगमध्ये सनरायझर्स ईस्टर्न केपचा सामना 29 डिसेंबर रोजी प्रिटोरिया कॅपिटल्सशी झाला. या सामन्यात विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकने एक मोठा टप्पा गाठला. तो टी20 मध्ये सलामीवीर म्हणून 10,000 धावा करणारा पहिला विकेटकीपर ठरला.

प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात डी कॉकने 47 चेंडूत 77 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने पाच चौकार आणि सहा षटकार मारले. तो सलामीवीर म्हणून 10,000 धावा करणारा पहिला विकेटकीपर ठरला. त्याच्या आधी इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही. सध्या, या विक्रम यादीत त्याच्या जवळपास दुसरा कोणताही खेळाडू नाही. क्विंटन डी कॉक पुन्हा एकदा आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. त्याला मुंबई इंडियन्सने मिनी-लिलावात बेस प्राईसवर विकत घेतले.

पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सलामीवीर आणि यष्टीरक्षक म्हणून 159 टी-20 सामन्यांमध्ये 6284 धावा केल्या आहेत. जोस बटलर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 143 सामन्यांमध्ये 5104 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा कामरान अकमल 4493 धावा करून यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचा देशबांधव मोहम्मद शहजाद 149 सामन्यांमध्ये 3894 धावा करून पाचव्या क्रमांकावर आहे.

सनरायझर्स ईस्टर्न केप आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स ईस्टर्न केपने 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा केल्या. क्विंटन डी कॉक व्यतिरिक्त, मॅथ्यू ब्रिट्झकेनेही या सामन्यात अर्धशतक झळकावले. तो 33 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 52 धावा काढून बाद झाला. जॉर्डन हरमनने 20 चेंडूत 37 धावा केल्या. गोलंदाजीत टायमल मिल्सने सर्वाधिक 2 बळी घेतले, तर लुंगी एनगिडी, विहान लुब्बे आणि ब्राइस पार्सन्स यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Comments are closed.