भुतानच्या फिरकीपटूने म्यानमारला झपाटले! येशेचा टी-20 सामन्यात 8 विकेटचा विश्वविक्रम

भूतानचा डावखुरा ऑफस्पिनर सोनम येशेने क्रिकेटच्या इतिहासाला नवे सोनेरी पान जोडले. 22 वर्षीय सोनम हा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या एका सामन्यात 8 विकेट टिपणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या चार षटकांत अवघ्या 7 धावांत  8 विकेट टिपत म्यानमारच्या फलंदाजांना अक्षरशः झपाटून टाकले.

गेलेफू येथे म्यानमारविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सोनम येशेने ही ऐतिहासिक कामगिरी केली. भूतान क्रिकेटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘हा अविस्मरणीय स्पेल आहे. सोनम येशेची 4 षटकांत 7 धावांत 8 विकेटची  कामगिरी विश्व विक्रम ठरली आहे.’ सोनमच्या या विक्रमी कामगिरीत एका निर्धाव षटकाचाही समावेश असून, त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 1.75 इतका राहिला. सोनम येशेच्या भेदक गोलंदाजीमुळे म्यानमारचा संघ 127 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 45 धावांत गारद झाला. भूतानने हा सामना 82 धावांनी जिंकत सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असून, हा संघ 5 सामन्यांच्या मालिकेत सध्या 4-0ने आघाडीवर आहे.

विकेट्स घेणारे दोन गोलंदाज

यापूर्वी पुरुषांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात 7 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती. मलेशियाच्या सयाजरुल इद्रुसने 2023 मध्ये चीनविरुद्ध 8 धावांत 7, तर बहरीनच्या अली दाऊदने 2025 मध्ये भूतानविरुद्ध 19 धावांत 7 विकेट अशी कामगिरी केली होती. पुरुषांच्या सर्व टी-20 क्रिकेटचा विचार केला तरीही 7 विकेट्स हाच उच्चांक होता. स्थानिक क्रिकेटमध्येही केवळ दोन वेळा अशी कामगिरी नोंदली गेली होती. 2019 मध्ये लेस्टरशायरकडून कॉलिन अॅकरमनने बार्ंमगहॅम बेअर्सविरुद्ध 18 धावांत 7 तर 2025 मध्ये ढाका पॅपिटल्सविरुद्ध दुबार राजशाहीकडून तस्कीन अहमदने 19 धावांत 7 विकेट घेतल्या होत्या. सोनम येशेच्या 8 विकेट्समुळे आता जागतिक स्तरावर नवा मापदंड निश्चित झाला आहे. महिलांच्या टी-20 क्रिकेटमध्ये इंडोनेशियाच्या रोहमालियाने 2024 मध्ये मंगोलियाविरुद्ध घेतलेल्या 0 धावेत 7 विकेट  या आकडय़ांना अद्याप सर्वोत्तम मानले जाते. मात्र, पुरुष किंवा महिला यापैकी कोणत्याही गटात टी-20 सामन्यात यापूर्वी कोणीही 8 विकेट्स घेतल्या नव्हत्या.

Comments are closed.