आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रशिक्षकपदी नियुक्ती

महिला प्रीमियर लीग 2026 9 जानेवारीपासून सुरू होत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी माजी ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर क्रिस्टन बीम्सला संघाचे स्पिन बॉलिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. WPL चा चौथा हंगाम 9 जानेवारीपासून सुरू होत आहे. अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

क्रिस्टन बीम्स यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. MI च्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या विशेष व्हिडिओमध्ये बीम्स यांनी आपली भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मी येथे पहिल्यांदाच प्रशिक्षक म्हणून येत आहे. झूलन गोस्वामी यांच्यासारख्या महान खेळाडूसोबत काम करण्याची ही उत्तम संधी आहे. मी ज्या खेळाडूंविरुद्ध कधीकाळी क्रिकेट खेळले, त्यांच्यासोबत आता एकाच संघात काम करणे खरोखरच विशेष आहे.”

पुढे बोलताना बीम्स म्हणाल्या की, मुंबई इंडियन्स संघाने दीर्घकाळ विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. “हा संघ केवळ खेळाडूंचा गट नाही, तर एक कुटुंब आहे. खेळाडूंमधील समन्वय आणि एकमेकांशी असलेली नाळ स्पष्टपणे दिसते. अशा मजबूत वातावरणाचा भाग बनणे, हे कोणत्याही प्रशिक्षकासाठी स्वप्नासारखे असते,” असे त्यांनी सांगितले.

41 वर्षीय क्रिस्टन बीम्स यांनी ऑस्ट्रेलिया महिला संघासाठी अनेक वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. 2017 वनडे वर्ल्ड कपमध्ये त्या सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होत्या. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी 1 कसोटी, 30 वनडे आणि 18 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय महिला बिग बॅश लीगमध्येही त्यांनी 45 टी20 सामने खेळत आपली छाप पाडली होती. त्यांच्या अनुभवाचा फायदा WPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सला निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

Comments are closed.