दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक… तरीही न्यूझीलंड वनडे मालिकेतून सलामीवीर जाणार बाहेर?, कारण ऐकून बसेल

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ एकदिवसीय मालिका: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या अखेरच्या वनडे सामन्यात यशस्वी जैस्वालने तुफानी शतक झळकावले होते. विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या वनडेत त्याने 121 चेंडूत 116 धावांची खेळी केली होती. या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारले होते. या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही मिळाला. मात्र, इतकी मोठी खेळी करूनही न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत त्याला संघात स्थान मिळणे कठीण असू शकते, ही बाब चाहत्यांना चकित करणारी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी अद्याप संघाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, संघनिवडीआधीच यशस्वी जैस्वालबाबत चर्चांना उधाण आले आहे.

शुभमन गिलचं पुनरागमन, यशस्वी जैस्वाल बाहेर…

यामागचे मुख्य कारण म्हणजे शुभमन गिलचं वनडे संघात पुनरागमन होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान गिल जखमी झाला होता, त्यामुळे तो संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर राहिला. त्याने टी20 मालिकेतून पुनरागमन केले असले तरी त्याची कामगिरी फारशी प्रभावी नव्हती. शुभमन गिल हा न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेचा किंवा टी20 वर्ल्ड कप संघाचा भाग नसला, तरी तो वनडे संघाचा कर्णधार असल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. गिल आणि रोहित शर्मा हे भारतासाठी सलामीला येतात, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. अशा परिस्थितीत सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालसाठी संघात जागा मिळवणे कठीण ठरू शकते.

आकडे काय सांगतात?

यशस्वी जैस्वालने आतापर्यंत भारतासाठी 4 वनडे सामने खेळले असून त्यात त्याने 171 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. शेवटच्या सामन्यातील नाबाद 116 धावा ही त्याची वनडेमधील सर्वोत्तम खेळी ठरली आहे. दुसरीकडे, 26 वर्षीय शुभमन गिलला बीसीसीआयने यावर्षी कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. गिलने भारतासाठी 58 वनडे सामन्यांत 99.22 च्या स्ट्राइक रेटने 2818 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 8 शतके आणि 15 अर्धशतके आहेत.

सलामीवीर म्हणून तुलना

सलामीवीर म्हणून शुभमन गिलने 53 वनडे सामन्यांत 2552 धावा केल्या असून त्यात 7 शतके आणि 14 अर्धशतके आहेत. वनडेमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 208 आहे. तर यशस्वी जैस्वालने सलामीवीर म्हणून केवळ 4 वनडे सामने खेळले असून त्यात 171 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची नाबाद 116 धावांची खेळी ही त्याच्या कारकिर्दीतील मोठी झेप मानली जाते. आता प्रश्न एकच शतक करूनही यशस्वी जैस्वालला न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळणार की शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे त्याला बाहेर बसावे लागणार? याचे उत्तर लवकरच संघनिवडीतून मिळेल.

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा संभाव्य संघ (India probable squad against New Zealand) – शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

हे ही वाचा –

Mumbai Indians News : पुन्हा ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! नव्या हंगामाआधी ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूशी डील, दिली मोठी जबाबदारी

आणखी वाचा

Comments are closed.