देशभरातील बांगलादेशी घुसखोर ओळखा.
आसाम येथील सभेत गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी आसामच्या एक दिवसीय दौऱ्यात अनेक विकासकामांचे उद्घाटन केले आहे. शाह यांनी प्रथम आसामच्या नगांव जिल्ह्यात वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थळ बटाद्रवा येथील प्रकल्पाचे उद्घाटन केले. बटाद्रवाला 227 कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकसित करण्यात आले आहे. यानंतर झालेल्या सभेत शाह यांनी केवळ आसाम नव्हे तर पूर्ण देशातील बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवू असे वक्तव्य केले आहे. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पवित्र मार्गेरिटा तसेच राज्याचे संस्कृतीमंत्री विमल बोरा उपस्थित होते.
गृहमंत्र्यांच्या आसाम दौऱ्याची सुरुवात गुवाहाटीत ‘शहीद स्मारक क्षेत्रा’त अवैध घुसखोरांच्या विरोधात आसाम आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर बोरदुरवा येथे आयोजित सभेला संबोधित करताना शाह यांनी वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानाला अतिक्रमणापासून मुक्त करविले असल्याचे म्हटले. वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांनी ‘एक भारत’चे आवाहन केले होते, ज्याचे पालन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. आसाममध्ये हेमंत विश्व शर्मा सरकारने बांगलादेशी घुसखोरांकडून 1 लाख एकरपेक्षा अधिक जमीन मुक्त करविली आहे. आम्ही केवळ आसाममधून नव्हे तर पूर्ण भारतातील सर्व बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटविणार आहोत असे शाह म्हणाले.
घुसखोरांना हटविण्याचा संकल्प
पूर्ण देशातून सर्व घुसखोरांना हटविण्याचा संकल्प भाजप घेत आहे. शंकरदेव यांच्या जन्मस्थळावर बांगलादेशी घुसखोर पोहोचले होते. तेथून घुसखोर हटवत नामघर पुन्हा स्थापित करण्यासाठी मी हेमंत विश्व शर्मा यांचे कौतुक करतो. एक लाख एकरापेक्षा अधिक जमीन घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त करविण्यात आली आहे. काँग्रेसने राज्यात अनेक वर्षे सरकार चालविले, परंतु त्याने आसाम आंदोलनात बलिदान देणाऱ्यांसाठी काहीच केले नाही. काँग्रेस पक्ष अनेक वर्षांपर्यंत घुसखोरांनाच गोंजारत राहिला आणि 1983 मध्ये आयएमडीटी कायदा आणून काँग्रेसने घुसखोरांना आसाममध्ये स्थायिक होण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिला होता असा दावा शाह यांनी केला.
भारतरत्न गोपीनाथ यांचे स्मरण
भारतरत्न गोपीनाथ यांचे आज मी स्मरण करतो. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना आसामला भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले होते. गोपीनाथ नसते तर बहुधा आसाम आणि पूर्ण ईशान्य क्षेत्र आज भारताचा हिस्सा नसता अशी टिप्पणी करत शाह यांनी नेहरूंना लक्ष्य केले आहे.
कोण होते गोपीनाथ बोरदोलोई
गोपीनाथ यांचे पूर्ण नाव गोपीनाथ बोरदोलोई होते, आसामचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. याचबरोबर आसामच्या आधुनिक ओळखीचा पाया रचणारे ते एक द्रष्टे नेता होते. त्यांचे पूर्ण जीवन आसामला समर्पित राहिले. कॅबिनेट मिशन प्लॅनला गोपीनाथ यांचा विरोध होता. कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत मुस्लीम लीग ईशान्य क्षेत्राला भारतापासून वेगळा करू इच्छित होता. परंतु स्थिती पाहता गोपीनाथ बोरदोलोई यांनी याच्या विरोधात अहिंसक आंदोलन सुरू केले. आसाम भारताचा हिस्सा रहावा म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या आंदोलनाला सरदार पटेलांचे पूर्ण समर्थन मिळाले होते.
आयसीसीएस सेंटर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुवाहाटी शहराच्या सुरक्षेला मजबूत करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत आणि 189 कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचे (आयसीसीएस) उद्घाटन केले आहे. आयसीसीएस राज्यात सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीला मजबूत करण्यासाठी गुवाहाटीत 2000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवणार आहे. याचबरोबर शाह यांनी ज्योति विष्णू सांस्कृततिक परिसराचे उद्घाटन केले आहे. हे 5000 आसनांची क्षमता असलेले एक ऑडिटोरियम आहे.
Comments are closed.