2025 मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारी टीम कोण? भारत-पाकिस्तानमध्ये काट्याची चुरस; ‘ही’ टीम ठरली नंबर-1

वर्ष 2025 आता समाप्तीच्या उंबरठ्यावर असताना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यश मिळवणाऱ्या संघांची चर्चा रंगू लागली आहे. या वर्षात कसोटी, एकदिवसीय आणि टी20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांची यादी समोर आली असून, यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची टक्कर पाहायला मिळाली. मात्र, या स्पर्धेत न्यूझीलंडने बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. फुल मेंबर संघांमध्ये 2025 मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ म्हणून न्यूझीलंड पुढे आला, तर भारत आणि पाकिस्तान संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

या यादीत पाचव्या क्रमांकावर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ संयुक्तपणे आहेत. या दोन्ही संघांनी 2025 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून प्रत्येकी 21 सामने जिंकले. दक्षिण आफ्रिकेने वर्षभरात एकूण 43 सामने खेळले, त्यापैकी 21 सामने जिंकले तर 22 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशने 47 सामने खेळताना 21 विजय मिळवले, मात्र 23 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघ टॉप-5 यादीत असले तरी त्यांचा विजय-पराभवाचा समतोल फारसा प्रभावी राहिला नाही.

तिसऱ्या क्रमांकावर जागतिक विजेता ऑस्ट्रेलिया संघ आहे. ऑस्ट्रेलियाने 2025 मध्ये एकूण 38 सामने खेळले असून त्यापैकी 23 सामने जिंकले आहेत. या कालावधीत त्यांना 11 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत त्यांना वर्षातील शेवटचा पराभव स्वीकारावा लागला असला, तरी एकूण कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने या यादीत भक्कम स्थान मिळवले आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांनी 2025 मध्ये प्रत्येकी 30-30 सामने जिंकत संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तुलनेत अधिक सामने खेळले. पाकिस्तानने 56 पैकी 30 सामने जिंकले, तर भारताने केवळ 45 सामन्यांतून तेवढेच विजय मिळवले. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयांमुळे भारतीय संघाची कामगिरी विशेष ठरली. या सर्वांवर कडी करत न्यूझीलंडने 2025 मध्ये 33 विजयांसह नंबर-1 स्थान पटकावले. 47 सामने खेळताना केवळ 9 पराभव, एक सामना ड्रॉ आणि चार अनिर्णित राहिले असून, न्यूझीलंडचा हा वर्षभरातील सातत्यपूर्ण कामगिरीचा पुरावा आहे.

Comments are closed.