कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकची हकालपट्टी; बोर्डाने करार संपण्याआधीच नातं तोडलं

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मोठा निर्णय घेत कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अजहर महमूद यांच्याशी करार संपण्याच्या तीन महिने आधीच वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. माजी कसोटी अष्टपैलू खेळाडू असलेल्या अजहर महमूद यांचा करार मार्च 2026 पर्यंत वैध होता, मात्र पीसीबीने तो आधीच संपवला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचा पुढील कसोटी सामना देखील मार्च 2026 मध्येच होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्नुसार, “अजहर महमूद यांचा करार मार्चमध्ये संपणार होता आणि त्याच कालावधीत पाकिस्तान संघाचा पुढील कसोटी दौरा सुरू होणार आहे. त्यामुळे बोर्डाला नव्या मुख्य प्रशिक्षकासाठी आधीपासूनच रणनीती आखायची आहे.” या कारणामुळेच पीसीबीने वेळेआधीच हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

अजहर महमूद यांचा पीसीबीसोबत दोन वर्षांचा करार होता. मागील वर्षी त्यांची पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी याआधीही संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत काम केले होते. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाची अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, पीसीबीने आता कसोटी संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. याशिवाय सहाय्यक प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्येही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) सायकल लक्षात घेता, बोर्ड संघाच्या दीर्घकालीन तयारीवर भर देत आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत पाकिस्तानचा पुढील कसोटी दौरा मार्च 2026 मध्ये बांगलादेश दौऱ्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये वेस्ट इंडीज आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौरा निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय नोव्हेंबर-डिसेंबर 2026 मध्ये पाकिस्तान श्रीलंकेचे यजमानपद भूषवणार असून मार्च 2027 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळणार आहे.

50 वर्षीय अजहर महमूद यांनी आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानकडून 21 कसोटी आणि 143 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी 900 धावा करत 39 विकेट घेतल्या, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1521 धावा आणि 123 विकेट त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी आकिब जावेद यांच्या जागी पाकिस्तानच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले होते. आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते, याकडे लक्ष लागले आहे.

Comments are closed.