शाळांना हादरे मुलांचे आरोग्य धोक्यात, वाड्यातील दगड खाणींच्या आवाजाने पाच हजार विद्यार्थ्यांचे कान बधिर होण्याची भीती

चिंचघर परिसरात दगडखाणींचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र दगडखाणींचा त्रास आसपासच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना होत आहे. मायनिंगच्या कर्णकर्कश आवाजामुळे शाळेला हादरे बसत असून विद्यार्थ्यांच्या कानाचे दडे बसत आहेत. त्यांचे कान अक्षरशः बधिर होण्याची भीती निर्माण झाली आहे. दगडखाणींतून ये-जा करणाऱ्या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अवघड झाले आहे. या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
वाड्यातील चिंचघर येथे दगडखाणीकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसह ह. वि. पाटील विद्यालय, नॅशनल इंग्लिश स्कूल अशा तीन शाळा आहेत. या शाळांमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र दगडखाणींच्या कामामुळे या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत आहे. या दगडखाणीतून निघणाऱ्या खाडी, माती आणि दगडाची डंपरमधून सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाडा-भिवंडी महामार्गावरील कुडूस नाक्यावर दररोज वाहतूककोंडी होते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांसह रुग्ण आणि वृद्धांची या वाहतूककोंडीत तासन्तास लटकंती होते.
शाळे समोरील रस्त्यावरून सतत सुरू असलेल्या या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
दगडखाणींचा आवाज आणि उडणारी धूळ यामुळे अनेक विद्यार्थ्यांना श्वसनाचे विकार जडले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांनाही त्याचा त्रास जाणवत आहे. वाड्यातील या दगडखाणी दिवस-रात्रा धडधडत असतात. त्याच्या आवाजामुळे अनेक विद्यार्थी रात्री झोपेत दचकून उठतात. दुसऱ्या दिवशी शाळेला दांडी मारावी लागते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जाग येणार का, असा जाब यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला. प्रशासनाने शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी शाळेसमोरून जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक थांबवण्याची मागणी यावेळी उपजिल्हाप्रमुख पाटील यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Comments are closed.