आयपीएलपूर्वी CSK ला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या साखळी सामन्यात सोमवारी म्हणजेच (29 डिसेंबर 2025) रोजी झारखंड आणि पुडुचेरी यांच्यात सामना झाला. या सामन्यात झारखंडने 123 धावांनी सहज विजय मिळवला. या सामन्यात पुडुचेरीचा कर्णधार अमान खान याच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे, जो त्याला कधीही आठवायला आवडणार नाही. विशेष म्हणजे, आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्सने अमान खानला 40 लाख रुपयांच्या मूळ किमतीत (बेस प्राईस) खरेदी केले होते. अमान हा एक अष्टपैलू खेळाडू असून तो फलंदाजीसोबतच मध्यमगती गोलंदाजीही करतो.
पुडुचेरी संघाचे नेतृत्व करणाऱ्या अमान खानने झारखंडविरुद्धच्या आपल्या 10 ओव्हरच्या स्पेलमध्ये 1 बळी घेत चक्क 123 धावा लुटवल्या. लिस्ट-ए क्रिकेटमधील एका सामन्यात कोणत्याही गोलंदाजाकडून सर्वाधिक धावा देण्याचा हा आतापर्यंतचा सर्वात खराब विक्रम ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अरुणाचल प्रदेशच्या मिबोम मोसूच्या नावावर होता, ज्याने गेल्या आठवड्यात बिहारविरुद्ध 9 ओव्हरमध्ये 116 धावा दिल्या होत्या. दरम्यान, या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झारखंडने 50 ओव्हरमध्ये 7 बाद 368 धावांचा डोंगर उभा केला होता. याला प्रत्युत्तर देताना पुडुचेरीचा संघ 41.4 ओव्हरमध्ये 235 धावांवर गारद झाला.
अमान खानने 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. चेन्नई सुपर किंग्समध्ये येण्यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांशी जोडलेला होता. अमान खानने आयपीएलमध्ये खेळलेल्या 12 सामन्यांत 115 धावा केल्या असून त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. अमानने आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी (First Class), 16 लिस्ट-ए आणि 32 टी20 सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5 अर्धशतकांच्या मदतीने 583 धावा, लिस्ट-ए मध्ये 2 अर्धशतकांच्या जोरावर 329 धावा, तर टी20 मध्ये 3 अर्धशतकांसह 500 धावा केल्या आहेत.
Comments are closed.