ईशान किशन की रिषभ पंत, वनडेमध्ये कोणाचे पारडे जड? पाहा संपूर्ण आकडेवारी
भारतीय वनडे संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. सध्या दुसऱ्या यष्टीरक्षक-फलंदाजाचा शोध सुरू असून, त्यासाठी तीन खेळाडूंची नावे चर्चेत आहेत. यामध्ये ईशान किशन, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे. जुरेल सध्या शर्यतीत थोडे मागे पडले आहेत, त्यामुळे आता खरी स्पर्धा ईशान किशन आणि ऋषभ पंत यांच्यातच रंगली आहे. या दोघांपैकी कोणाची वनडे आकडेवारी सरस आहे, यावर सध्या चर्चा सुरू आहे.
वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर ईशान किशन सतत संघाबाहेर होता. मात्र, यावेळी त्याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 आणि विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. याच कामगिरीमुळे तो शर्यतीत पुढे निघून गेला आहे. किशनने आतापर्यंत 24 सामने खेळले असून, त्यामध्ये त्याने 42.40 च्या सरासरीने 933 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने एक द्विशतक आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. किशनचा स्ट्राइक रेट 102.19 राहिलेला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या या जोमदार कामगिरीमुळे सध्या तो मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा आवडता खेळाडू असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे, रिषभ पंत सध्या वनडे संघात दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून दिसत असला तरी, त्याचे स्थान अद्याप निश्चित मानले जात नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये पंतला बेंचवर बसावे लागले होते. ऋषभ पंतने आतापर्यंत 27 वनडे सामने खेळले असून, 33.50 च्या सरासरीने 871 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके लगावली आहेत. पंतचा स्ट्राइक रेट 106.21 आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सध्या मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे पंतच्या बाजूने नसल्याचे समजते.
Comments are closed.