टी20 मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या फलंदाजाला वनडे संघात संधी द्या! आर अश्विनची मागणी, म्हणाला- हाच 'फ्यूचर स्टार'

2025 या वर्षात अभिषेक शर्माच्या बॅटने मैदानात मोठी खळबळ माजवली. अभिषेकने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वादळी फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. या डावखुऱ्या फलंदाजाने स्वबळावर टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये संस्मरणीय विजय मिळवून दिला. यामुळेच भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनची अशी इच्छा आहे की, अभिषेकला पुढील वर्षी एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्येही आपली चमक दाखवण्याची संधी मिळावी.

अश्विनने अभिषेकचे भरभरून कौतुक केले असून त्याला भविष्यातील ‘एक्स फॅक्टर’ खेळाडू म्हटले आहे. यावर्षी टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून अभिषेकने मान मिळवला.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आर अश्विन म्हणाला, “हे केवळ अभिषेक शर्माचे पुनरागमन नाही, तर भारताच्या पुढील पिढीतील एका ‘एक्स फॅक्टर’ खेळाडूचे आगमन आहे. जर 2025 मध्ये टीम इंडियासाठी कोणी सर्वोत्तम फलंदाज ठरला असेल, तर तो अभिषेक शर्मा आहे. त्याने लाजवाब फलंदाजी केली. त्याने भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये खेळण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली. मला त्याला वनडे फॉरमॅटमध्येही खेळताना पाहायला आवडेल. माझ्या मते, त्याला ‘मेन्स टीम प्लेयर ऑफ द इयर’ म्हणून निवडले जावे.”

अभिषेक शर्मासाठी 2025 हे वर्ष अतिशय चमकदार ठरले. त्याने या वर्षी खेळलेल्या 21 सामन्यांमध्ये 193 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने आणि 42 च्या सरासरीने 859 धावा कुटल्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि 5 अर्धशतके झळकावली. आशिया चषक 2025 मध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यातही अभिषेकची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

या डावखुऱ्या फलंदाजाने स्पर्धेत शानदार फलंदाजी करत 7 सामन्यात 44 च्या सरासरीने आणि 200 च्या स्ट्राईक रेटने एकूण 314 धावा केल्या होत्या. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अभिषेक भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 2025 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने अभिषेकने अनेक मोठे विक्रमही मोडीत काढले.

Comments are closed.