ईशान्य भारताला अस्थिर करण्याचा डाव हाणून पाडण्यात आला आहे.
आसाम, त्रिपुरामधून 11 दहशतवाद्यांना अटक : बांगलादेशशी दहशतवाद्यांचे कनेक्शन
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम आणि त्रिपुरामध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. बांगलादेशच्या कट्टरवादी संघटनांशी निगडित एका मोठ्या नेटवर्कला उद्ध्वस्त करत पोलिसांनी एकूण 11 दहशतवाद्यांना अटक केली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपूटच्या आधारावर स्पेशल टास्क फोर्सने ही कारवाई केल्याची माहिती गुवाहाटीचे पोलीस आयुक्त पार्थसारथी महंत यांनी मंगळवारी दिली आहे.
सोमवारी रात्री आसामच्या बारपेटा, चिरांग, बक्सा आणि दरांग जिल्ह्यांसोबत शेजारी राज्य त्रिपुरामध्येही मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली. यादरम्यान एकूण 11 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. हे दहशतवादी थेट स्वरुपात बांगलादेशात सक्रिय कट्टरवादी संघटनांच्या आदेशांवर काम करत होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी 10 जण आसामचे रहिवासी आहेत.
यातील एक आरोपी जागीर मिया याला त्रिपुरातून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेले दहशतवादी हे ‘आयएमके’ मॉड्यूलचे सदस्य असल्याचा पोलिसांचा दावा आहे. आसामसह पूर्ण ईशान्य भारताला अस्थिर करण्याचा त्यांचा कट होता. हे दहशतवादी या क्षेत्रात ‘मुस्लीम दबदबा’ निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते आणि ‘गजवतुल हिंद’ची विचारसरणी फैलावत होते.
बांगलादेशात सत्तापरिवर्तनानंतर सक्रिय
छाप्यादरम्यान पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून अनेक संशयास्पद सामग्री हस्तगत केली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात सत्तापरिवर्तन झाल्यावर दहशतवादी हालचालींमध्ये वाढ झाली असून ईशान्येत अनेक नव्या-जुन्या दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याचा खुलासा पोलीस आयुक्तांनी केला आहे.
'पूर्वा आकाश' ग्रुप
जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी), अंसारुल्लाह बांगला टीम (एबीटी) आणि अल-कायदाच्या म्होरक्यांनी भारतीय मॉड्यूल सक्रिय करण्याचे निर्देश दिले होते. शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडावे लागल्यावर बांगलादेशात आयएमकेच्या आमिरला तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते, त्यानंतरच भारतविरोधी कटांना वेग आला. हे पूर्ण सिंडिकेट एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे संचालित होते. ‘पूर्वा आकाश’ नावाने एका ग्रुपचा वापर नव्या लोकांची भरती, कट्टरवाद फैलावणे आणि निधी जमविण्यासाठी केला जात होता.
निशाण्यावर आसाम, बंगाल, त्रिपुराचे युवा
आयएमकेकडून आसाम, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरांच्या युवांना लक्ष्य केले जात होते. बांगलादेशी नागरिक उमर आणि खालिदला आसामच्या स्लीपर सेलसोबत ताळमेळ निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ज्याचे नेतृत्व बारपेटा येथील तमीम करत होता, त्याच्यासोबत आणखी अनेक लोक सक्रिय होते.
दहशतवाद्यांच्या हालचालींवर नजर
आसाममधून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नसीम उद्दीन उर्फ तमीम (24 वर्षे), सुल्तान महमूद (40 वर्षे), मोहम्मद सिद्दीक अली (46 वर्षे), रसीदुल आलम (28 वर्षे), महिबुल खान (25 वर्षे), शारुक हुसैन (22 वर्षे) आणि मोहम्मद दिलबर रजाक (26 वर्षे) अशी आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणा आसाममधील दहशतवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत.
Comments are closed.